सिंधुदुर्ग जिल्ह्यातील “दशावतार नाट्यमंडळांना भेडसावणाऱ्या समस्या शासन दरबारी”

सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याकडे दशावतार कलाकार व नाट्यमंडळांच्या विविध समस्या व मागण्यांबाबत आमदार प्रमोद जठार यांचे निवेदन

दशावतार कलाकारांना मिळणार शासनाचे अधिकृत ओळखपत्र

मुंबई – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पारंपरिक दशावतार कलेच्या जतन व संवर्धनासाठी आज दिनांक १० जून २०२६ रोजी मंत्रालय येथे माननीय नामदार आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत प्रमोद जठार यांनी दशावतार कलाकार व नाट्यमंडळांच्या विविध समस्या आणि मागण्यांबाबत सविस्तर निवेदन सादर केले.
सदर बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे संबंधित सचिव तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान दशावतार कलेच्या संवर्धनासाठी विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
आमदार प्रमोद जठार यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेत माननीय मंत्री महोदयांनी संबंधित विभागांना पुढील मागण्या तातडीने पूर्ण करण्याबाबत आदेश दिले आहेत. यामध्ये आता दशावतार कलाकारांना शासनाकडून अधिकृत ओळखपत्र देण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

  • सिंधुदुर्ग जिल्ह्यात “सिंधुदुर्ग दशावतार महोत्सव” मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात यावा.
  • दशावतार कलेच्या जतन व प्रसारासाठी जास्तीत जास्त कार्यशाळांचे आयोजन करण्यात यावे.
  • दशावतार कलेचा शैक्षणिक अभ्यासक्रमात समावेश करण्याबाबत बालभारती यांना आवश्यक सूचना देण्यात याव्यात.
  • दशावतार कलाकारांची अधिकृत दूरध्वनी निर्देशिका (Directory) तयार करण्यात यावी.
    या प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या असून बैठकीत दशावतार ही केवळ लोककला नसून कोकणच्या सांस्कृतिक अस्मितेचे प्रतीक असल्याचे नमूद करण्यात आले. कलाकारांचे प्रश्न सोडवून या पारंपारिक कलेला राज्यस्तरावर अधिक बळ देण्यासाठी शासन सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे मंत्री महोदयांनी स्पष्ट केले. आमदार प्रमोद जठार यांनी यावेळी संपूर्ण दशावतार कलाकार वासियांच्या वतीने सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचे आभार व्यक्त केले.

error: Content is protected !!