कुडाळ : येथील नाबरवाडी ते एमआयडीसीकडे जाणाऱ्या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून मागील महिनाभर सातत्याने करण्यात येत होती. दरम्यान, लगत जमीनमालक यांनी या रस्त्याबाबत हद्दीवर मालकी हक्काचा वाद असल्याचे नगरपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्याने, रस्त्याची मोजणी व हद्द निश्चिती झाल्यानंतरच पुढील कार्यवाही व शासकीय निधी खर्च करणे शक्य असल्याचे नगरपंचायत प्रशासनाने, सबंधित जमीन मालक ,उपस्थित स्थानिक यांना नगराध्यक्ष यांच्या समक्ष चर्चेत स्पष्ट केले.
मात्र, रस्त्याची मोजणी होण्यासाठी वेळ लागणार असून गेली अनेक वर्षे तसेच आगामी पावसाळ्यात या खराब रस्त्यावरून प्रवास करणे नागरिकांसाठी अत्यंत जिकिरीचे ठरणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
नागरिकांची गैरसोय आणि प्रशासनासमोरील तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन कुडाळ नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर- शिरवलकर यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने नबरवाडी–एमआयडीसी मार्गावरील खराब झालेला पृष्ठभाग सुस्थितीत करण्याचे काम हाती घेतले. हद्दीच्या वादात अनेक वर्षे अडकून पडलेल्या या रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून ये-जा अधिक सुरक्षित व सुलभ झाली आहे. यावेळी नगरसेविका नयना मांजरेकर आणि ग्रामस्थ उपस्थित होते.





Subscribe










