शिवराज्याभिषेक हा स्वाभिमान, स्वराज्य आणि न्यायव्यवस्थेच्या विजयाचा ऐतिहासिक क्षण – प्रा. रुपेश पाटील

बांदा : “रयतेचे राज्य, न्यायाचे राज्य आणि स्वाभिमानाचे राज्य म्हणजे शिवरायांचे स्वराज्य.” छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा केवळ एका राजाचा अभिषेक नव्हता, तर तो गुलामगिरीविरुद्धच्या स्वाभिमानाचा, स्वराज्याच्या संकल्पनेचा आणि हिंदवी साम्राज्याच्या पुनरुत्थानाचा ऐतिहासिक क्षण होता. शिवरायांनी सर्वसामान्यांच्या मनात स्वत्वाची आणि स्वराज्याची जाणीव निर्माण केली. आजच्या पिढीने त्यांच्या विचारांचा वारसा जपत राष्ट्रप्रेम, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकी जोपासणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्रा. रुपेश पाटील यांनी केले.

बांदा येथील नट वाचनालयात शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

यावेळी उपाध्यक्ष नीलेश मोरजकर, संचालक जगन्नाथ सातोस्कर, शंकर नार्वेकर, संचालिका सौ. स्वप्नीता सावंत, माजी सचिव गुरुनाथ नार्वेकर, अनंत भाटे, स्वराज्य प्रतिष्ठानचे भूषण सावंत, संकेत वेंगुर्लेकर, प्रवीण परब, तनिष मेस्त्री, सौ. नेत्रा राणे, डॉ. केदार, नैतिक मोरजकर तसेच वाचनालयाचे कर्मचारी सुनील नातू, ओंकार राऊळ, अमिता परब आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रा. रुपेश पाटील यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून शिवरायांच्या कार्याचा ऐतिहासिक, सामाजिक आणि प्रशासकीय दृष्टिकोनातून उहापोह केला. स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी केलेला संघर्ष, लोकाभिमुख प्रशासन, सर्वधर्मसमभावाची भूमिका आणि दूरदर्शी नेतृत्व याविषयी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिवचरित्रातून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

यावेळी अनंत भाटे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांना सुराज्य अर्थात जनतेचे राज्य निर्माण करायचे होते. यासाठी त्यांनी तत्कालीन परिस्थितीत अनेकांचा विरोध झुगारून देत राज्याभिषेक करवून घेतला. त्यामुळे जनतेला हक्काचे आणि न्यायाधिष्ठित राज्य प्राप्त झाले.

या कार्यक्रमास वाचनालयाचे वाचक, शिवप्रेमी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. पाटील यांच्या प्रेरणादायी आणि अभ्यासपूर्ण व्याख्यानाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील नातू यांनी केले, तर आभार प्रदर्शन नीलेश मोरजकर यांनी केले.

error: Content is protected !!