अखेर तो चिमुकला आईच्या स्वाधीन

रात्री घराचा दरवाजा उघडा असताना घराबाहेर गेल्याचे स्पष्ट

मालवण : शहरातील भरड परिसरात बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दीड ते दोन वर्षांचा एक चिमुकला मुलगा एकटाच फिरताना स्थानिकांच्या निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली होती. हा मुलगा कोण आणि कुठून आला, याबाबत अनेक तर्क वितर्क लढवले जात असताना या मुलाच्या पालकांचा शोध घेण्यासाठी मालवण पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी देखील शोधमोहीम राबवली. या शोध मोहिमेला यश आले असून या मुलाला त्याच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले आहे. रात्री घराचा दरवाजा उघडा असताना हा मुलगा घराबाहेर गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

हा मुलगा नेमका कोणाचा आहे आणि तो भरड परिसरात कसा पोहोचला, याचा शोध पोलिसांकडून सुरु होता. यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करुन स्थानिक नागरिकांकडूनही माहिती संकलित केली जात होती. या बालकाची ओळख पटत असल्यास किंवा त्याच्या पालकांबाबत कोणतीही माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन मालवण पोलिसांनी केले होते. त्यानुसार नागरिक देखील या मुलाच्या पालकाचा शोध घेत असताना हा मुलगा एसटी स्टॅण्डच्या पाठिमागे राहणाऱ्या परप्रांतीय कामगार कुटुंबातील असल्याचे स्पष्ट झाले. रात्री दरवाजा उघडा असताना मुलगा बाहेर गेला होता. अखेर मुलाच्या आईने मुलाला ताब्यात घेतले असून मालवण शहरातील चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

error: Content is protected !!