१.८०० किलो वजनाच्या दुर्मिळ खवले मांजराच्या खवल्यांसह ९२ लाखांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई

कुडाळ तालुक्यातील रानबांबुळी येथील घटना

कुडाळ : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाणे हद्दीत धडक कारवाई करत तब्बल ९२ लाख रुपये किंमतीची दुर्मिळ खवले मांजराची खवले, सांबराची दोन शिंगे तसेच दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या प्रकरणी चौघांविरोधात भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवार दि. २९ मे २०२६ रोजी सकाळी ११.४० वाजण्याच्या सुमारास रानबांबुळी येथील अनावकरवाडी परिसरात करण्यात आल्याची माहीती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून देण्यात आली.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत १.८०० किलो वजनाची दुर्मिळ वन्यजीव खवले मांजराची खवले, सांबराची दोन शिंगे आणि दोन मोटारसायकली असा एकूण ९२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी संशयित गणेश प्रदीप शिर्के (वय ३०, रा. पडवे, ता. कुडाळ), विठोबा भगवान बावळेकर (वय ८२, रा. रानबांबुळी), शंकर यशवंत तारापूरे (वय ३१, रा. पाडवे) आणि कालिदास दत्तात्रय वारंग (वय ५५, रा. सुकळवाड, ता. मालवण) यांच्याविरोधात भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९, ४४, ४९(ब), ५१ तसेच बीएनएस कलम ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहीती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर व अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक अनिल हडळ, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेश राठोड, हेड कॉन्स्टेबल डॉमिनिक डिसोजा, श्री. राणे, श्री.जॅक्सन तसेच पोलीस कर्मचारी श्री. कांडर व श्री. समजिस्कर यांच्या पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास सिंधुदुर्गनगरी पोलीस ठाण्यात सुरू आहे.

error: Content is protected !!