मडगाव-पनवेल स्पेशल ट्रेनच्या डब्याला आग

सुदैवाने जीवितहानी टळली

गोव्यातील मडगाव रेल्वे स्थानकानजीक उभी करण्यात आलेल्या मडगाव–पनवेल विशेष रेल्वेगाडीच्या एका डब्याला शुक्रवारी दुपारी भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत रेल्वेचा एक डबा पूर्णपणे जळून खाक झाला. सुदैवाने, दुर्घटनेच्या वेळी गाडीत एकही प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली. मडगाव अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.

ही घटना दुपारी सुमारे २:५० वाजण्याच्या सुमारास घडली. शनिवारी मडगाव जंक्शनवरून पनवेलच्या दिशेने रवाना होणारी ही विशेष गाडी स्थानकाच्या आऊटर ट्रॅकवर उभी होती. आग लागल्याची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी १४ अग्निशमन सिलिंडरच्या साहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आगीची तीव्रता वाढल्याने ती नियंत्रणाबाहेर गेली. त्यानंतर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले.

आग विझवण्यापूर्वी सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे मार्गावरील २५ केव्ही क्षमतेची उच्च दाबाची वीजवाहिनी बंद करण्यात आली. तसेच, इंजिनलगतच्या डब्याला आग लागल्याने इतर डब्यांपर्यंत आग पसरू नये म्हणून संबंधित डबा तातडीने वेगळा करण्यात आला. मडगाव अग्निशामक दलाला स्थानक परिसरात थेट प्रवेशाचा मार्ग नसल्याने सुरुवातीला अडचणी निर्माण झाल्या. अखेर ईएसआय इस्पितळासमोरील जागेत अग्निशमन बंब उभे करून लांब पाईप्सच्या सहाय्याने पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणण्यात आली.

दरम्यान, प्राथमिक तपासात ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागलेली नसून कुणीतरी मुद्दामहून लावल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. कोकण रेल्वेचे वरिष्ठ जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनीही घातपाताची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी कोकण रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा दल (RPF) यांच्याकडून सुरू असून चौकशी समितीच्या अहवालानंतरच आगीचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

error: Content is protected !!