वेंगुर्ल्यात बेकायदेशीर बंदूक बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

पोलिसांची रात्री अकरा वाजता मोठी कारवाई

वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली-राजापूरकरवाडी येथे पोलिसांच्या पथकाने अचानक टाकलेल्या छाप्यात एका घरात लपवून ठेवलेली बेकायदेशीर व विनापरवाना सिंगल बॅरेल ठासणीची बंदूक जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी विवेक अर्जुन राजापूरकर (वय ४२) याच्याविरुद्ध वेंगुर्ले पोलीस ठाण्यात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाभोली येथील विवेक राजापूरकर हा कोणत्याही परवान्याशिवाय बेकायदेशीररीत्या सिंगल बॅरल ठासणीची बंदूक बाळगून त्याचा वापर करत असल्याची गोपनीय माहिती वेंगुर्ले पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सोमवार, १८ मे रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने राजापूरकरवाडी येथील विवेकच्या घरावर अचानक छापा टाकला. या कारवाईत घराच्या पडवीत लपवून ठेवलेली सुमारे १० हजार रुपये किमतीची एक विनापरवाना सिंगल बॅरेल ठासणीची बंदूक पोलिसांना मिळून आली.

या प्रकरणी पोलीस पथकातील अंमलदार जयेश सरमळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विवेक राजापूरकर याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या प्रत्यक्ष सहभागासह पोलीस हवालदार योगेश सराफदार, स्वप्नील तांबे, मनोज परुळेकर, जयेश सरमळकर आणि महिला पोलीस कर्मचारी गौरी ताम्हणेकर यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल भगवान चव्हाण करत आहेत.

error: Content is protected !!