कुडाळ शहरात इंधनाचा तुटवडा

पेट्रोल – डिझेलचा साठा संपल्याने वाहनधारकांची तारांबळ

कुडाळ : कुडाळ शहरात आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी इंधनाचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने वाहनधारकांचे प्रचंड हाल झाले. शहरातील बहुतांशी पेट्रोलपंपांवरील पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपल्याने सोमवारी सकाळपासूनच पंपांवर ‘पेट्रोल-डिझेल संपले आहे’ असे फलक पाहायला मिळाले.

सकाळच्या वेळी कामावर जाण्यासाठी निघालेले नोकरदार, व्यावसायिक जेव्हा पेट्रोल भरण्यासाठी पंपावर पोहोचले, तेव्हा साठा नसल्याचे समजताच त्यांची मोठी पंचाईत झाली. एका पंपावर इंधन नसल्याने वाहनधारक दुसऱ्या पंपाकडे धाव घेत होते, मात्र तिथेही तीच परिस्थिती असल्याने शहरात सर्वत्र वाहनधारकांची धावपळ उडाली. इंधन तुटवड्याचा सर्वाधिक फटका मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांना आणि कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना बसला. तासनतास पंपावर वाट पाहूनही इंधन मिळत नसल्याने अनेकांना आपले नियोजित दौरे रद्द करावे लागले. काही पंपांवर इंधन साठा उपलब्ध नसल्याचे फलक लागल्याने वाहनधारकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

हा साठा तांत्रिक कारणामुळे संपला की पुरवठ्यात काही अडथळा निर्माण झाला आहे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. मात्र, हा तुटवडा लवकर दूर न झाल्यास नागरिकांच्या अडचणीत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने आणि संबंधित कंपन्यांनी याकडे लक्ष देऊन पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

error: Content is protected !!