देवगड : तालुक्यातील फणसे येथील समुद्रात मासेमारी दरम्यान नौकेवरून बेपत्ता झालेल्या सुरज सूर्यकांत आचरेकर (३०, रा. मोंड झरकरवाडी) या खलाशाचा दुर्दैवी अंत झाला आहे. दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर, रविवारी सकाळी ९:१५ वाजण्याच्या सुमारास फणसे किनाऱ्यालगतच्या पाण्यात त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे मोंड परिसरात हळहळ व्यक्त होत असून देवगड पोलीस स्थानकात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरज आचरेकर हा ‘बन्सी’ नावाच्या मासेमारी नौकेवर खलाशी म्हणून कार्यरत होता. १ मे रोजी रात्री १२ ते पहाटे ५ वाजण्याच्या दरम्यान, फणसे समुद्रामध्ये ही नौका नांगर टाकून उभी करण्यात आली होती. याच कालावधीत सुरज नौकेवरून अचानक बेपत्ता झाला. सहकाऱ्यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्याचा कोणताही पत्ता लागला नव्हता.
सुरज बेपत्ता झाल्याची तक्रार हितेश संजय हरम (२६, रा. देवगड किल्ला) यांनी देवगड पोलीस ठाण्यात दाखल केली होती. तेव्हापासून पोलीस आणि स्थानिक मच्छीमार त्याचा शोध घेत होते. अखेर रविवारी सकाळी त्याचा मृतदेह किनारी भागात तरंगताना मिळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून अधिक तपास देवगड पोलीस करत आहेत.


Subscribe










