४ वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू
देवगड तालुक्यातील घटना
देवगड : तळवडे परबवाडी येथे वडील चालवत असलेल्या बोलेरो पिकअप गाडीच्या मागील चाकाखाली सापडून झालेल्या अपघातात तेथिल रूंजी हरेश परब या चार वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यु झाला. ही घटना रविवारी दुपारी ३.३० वा. सुमारास घडली. या घटनेमुळे देवगड तालुक्यात हळहळ होत आहे दरम्यान या घटनेची नोंद देवगड पोलिस स्थानकात करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, तळवडे परबवाडी येथील हरेश परब हे आई, पत्नी, मुलगा रूद्र व मुलगी रूंजी यांच्यासमवेत राहतात. ते मोलमजुरीची कामे करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी पांडूरंग कदम यांची बोलेरो पिकअप गाडी कामानिमित्त आपल्या घरी आणली होती. ही गाडी पांडूरंग कदम यांना देण्यासाठी रविवारी दुपारी ३.३० वा. सुमारास ते आपल्या घराकडून निघाले होते. यावेळी त्यांचा गाडीतील क्लिनर सीटवर त्यांची मुलगी रूंजी ही बसली होती. तिने गाडीतून उतरण्याचा हट्ट केल्याने हरेश यांनी तिला घरी जाण्यास सांगीतले. गाडीतून उतरून ती घरी गेल्याचे हरेश यांना वाटल्याने त्यांनी गाडी सुरू करून पुढे जात असताना गाडीच्या क्लीनर साईडच्या पाठीमागील चाकाचा धक्का रूंजी हिला बसला.या घटनेत रूंजी हिच्या डोक्याला गंभीर दुखापत होवून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. ही घटना लक्षात येताच परब दांपत्य व महेश अनाजी लाड यांनी रूंजी हिला तात्काळ देवगड येथील खाजगी रूग्णालयात दाखल केले. तेथून तिला देवगड ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आले. परंतू उपचार सुरू करण्यापुर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले.
या घटनेची फिर्याद हरेश परब यांचे सख्खे चुलत भाऊ आनंद शांताराम परब (४८) रा.तळवडे परबवाडी यांनी देवगड पोलिस स्थानकात दिली. सहाय्यक पोलिस निरिक्षक सुप्रिया बंगडे, महिला पोलिस हवालदार विनीता भुजे, पोलिस हवालदार गणपती गावडे यांनी देवगड ग्रामीण रूग्णालयात भेट देवून घटनेची माहिती घेतली व पंचनामा केला. देवगड ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून सायंकाळी उशिरा मृतदेह नातेवाईकांचा ताब्यात देण्यात आला. या घटनेचा तपास पोलिस हवालदार आशिष कदम करीत आहेत.
आपल्या चिमुकलीचा अपघाती मृत्युने तिच्या आई-वडीलांनी देवगड ग्रामीण रूग्णालयात केलेला आक्रोश उपस्थितांचे ह्वदय पिळवटून टाकणारा होता. या अपघाताचे वृत्त तळवडे गावात समजताच गावातील नागरिकांनी देवगड रुग्णालयात धाव घेतली.


Subscribe










