कुडाळ आंब्रडच्या विद्यार्थ्याची वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील आंब्रड येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याने सांगली जिल्ह्यातील वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. गौरेश योगेश लाड (वय १७, रा. आंब्रड, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, बुधवारी त्याच्यावर आंब्रड येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

गौरेशचे आई-वडील दोघेही पोलीस दलात कार्यरत आहेत. दहावीच्या परीक्षेत ९३ टक्के गुण मिळवून त्याने उल्लेखनीय यश संपादन केले होते. पुढील उच्च शिक्षणासाठी त्याला सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर (इस्लामपूर) येथे पाठवण्यात आले होते. त्याच्या उज्ज्वल शैक्षणिक कामगिरीमुळे कुटुंबीयांसह परिसरातील नागरिकांना त्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (२८ जुलै) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गौरेश ईश्वरपूर येथील वसतिगृहातील खोली क्रमांक १०१ मध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना निदर्शनास येताच वसतिगृह प्रशासनाने तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.

आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, या प्रकरणी ईश्वरपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वसतिगृहाचे लिपिक तानाजी ताटे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

अभ्यासात हुशार आणि उज्ज्वल भवितव्य असलेल्या या तरुण विद्यार्थ्याच्या अकाली जाण्याने आंब्रड गावासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

error: Content is protected !!