पत्नीला भेटायला निघालेले पिता-पुत्री बेपत्ता

बांदा बसस्थानकाजवळ सापडली दुचाकी

दुचाकीजवळ चावी व रेनकोटची पिशवी तशीच आढळल्याने गुड वाढले

दोडामार्ग : सावंतवाडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पत्नीला भेटण्यासाठी मोरगाव येथून निघालेले पती आणि त्यांची सहा वर्षांची मुलगी रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लाडोबा लवू कदम (वय ४०) आणि निहालिका लाडोबा कदम (वय ६, दोघे रा. मोरगाव) अशी बेपत्ता झालेल्या पिता-पुत्रीची नावे आहेत. १६ जुलै रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास लाडोबा हे आपल्या मुलीला घेऊन सावंतवाडीतील साई हॉस्पिटलकडे जाण्यासाठी निघाले होते. या रुग्णालयात त्यांच्या पत्नीवर पित्ताशयाच्या शस्त्रक्रियेनंतर उपचार सुरू असून, निघताना त्यांनी स्वतः फोन करून मेहुणे प्रितम कदम यांना याबाबत माहिती दिली होती.

मात्र दुपार उलटून गेली तरीही दोघे रुग्णालयात न पोहोचल्याने नातेवाईकांनी त्यांच्या भ्रमणध्वनीवर (मोबाईल) संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा मोबाईल बंद येत असल्याने कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आणि त्यांनी तातडीने विविध ठिकाणी त्यांचा शोध सुरू केला. शोधाशोध करत नातेवाईक बांदा बसस्थानक परिसरात पोहोचले असता, काही स्थानिकांनी या पिता-पुत्रीला तेथे पाहिल्याचे सांगितले.

दरम्यान, बांदा बसस्थानकाजवळच लाडोबा यांची हिरो होंडा मोटरसायकल उभी असलेल्या स्थितीत आढळून आली. विशेष म्हणजे, या दुचाकीला चावी तशीच लावलेली होती आणि गाडीवर रेनकोटची पिशवीही अडकवलेली होती. गाडी सापडूनही परिसरात व इतर नातेवाईकांकडे सर्वत्र शोध घेऊनही या पिता-पुत्रीचा काहीही सुगावा लागलेला नाही. अखेर याप्रकरणी प्रितम अर्जुन जाधव (वय ३१, रा. मळगाव-जाधववाडी, ता. सावंतवाडी) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

बेपत्ता लाडोबा कदम यांची उंची ५ फूट ४ इंच, सावळा वर्ण, काळे केस, मिशी व फ्रेंचकट दाढी असून त्यांच्या अंगात पांढरा टी-शर्ट व पॅन्ट आहे; तर मुलगी निहालिका हिची उंची ३ फूट, सावळा वर्ण, सरळ बॉबकट केस असून तिने नारंगी रंगाचे जॅकेट परिधान केले आहे. हे दोघेही कुठे आढळून आल्यास तात्काळ स्थानिक पोलिसांशी किंवा नातेवाईकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!