राज्यातील ग्रामपंचायतीतील सदस्य / थेट सरपंच यांच्या निधन, राजीनामा, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे दिनांक ३१.०१.२०२६ पर्यंत रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम मा.राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केला आहे.
त्यानुसार सिंधुदुर्ग १०५ ग्रामपंचायतींमध्ये १२ थेट सरपंच व १४३ सदस्य पदांची पोट निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. दिनांक ०७.०४.२०२६ ते १३.०४.२०२६ या कालावधीत थेट सरपंच पदाकरिता २० तर सदस्य पदाकरिता १४३ नामनिर्देशनपत्र दाखल झालेली आहेत. दाखल नामनिर्देशन पत्रांपैकी सदस्य पदाकरिता भरलेले ०२ नामनिर्देशनपत्र अपात्र झाली आहेत. सरपंच पदाकरिता नामनिर्देशनपत्र भरलेल्या उमेदवारांपैकी ५ तर सदस्य पदाकरिता नामनिर्देशनपत्र भरलेल्या उमेदवारांपैकी १४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेले आहेत.
निवडणूक कार्यक्रमानुसार एकूण १४ ग्रामपंचायतींमध्ये दिनांक- २८.०४.२०२६ रोजी निवडणूक होणार आहे. यामध्ये थेट सरपंच निवडणूक पदाकरिता ५ ग्रामपंचायतीकरिता ११ उमेदवारांमध्ये निवडणूक लढत होणार आहे. तसेच सदस्य पदाच्या पोट निवडणुकीसाठी ९ ग्रामपंचायतीकरिता २३ उमेदवारांमध्ये निवडणूक लढत होणार आहे.
सरपंच पदाची थेट निवडणूक – कणकवली मधील घोणसरी, मालवण मधील सुकळवाड, चौके, कुडाळ मधील कालेली, सावंतवाडी मधील माजगाव या ग्रामपंचायतीमध्ये होणार आहे.
तसेच सदस्य पदाकरिता निवडणूक – कणकवली मधील दारिस्ते, तळेरे, मालवण मधील धामापूर, वराड, कुडाळ मधील गावराई, चेंदवण, रानबुंबळी, वेंगुर्ला मधील मठ, सावंतवाडी मधील नाणोस या ग्रामपंचायतीमध्ये सदस्य पदाकरिता पोटनिवडणूक होणार आहे.
एकूण १४ ग्रामपंचायतीमध्ये १४,२१० मतदार दिनांक २८.०४.२०२६ रोजी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी आहे. तरी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.


Subscribe










