अशीही एक अनोखी गुरुपौर्णिमा

सानिका तुळसकर यांनी साजरी केली आश्रमातील निराधार वृद्धांसोबत गुरुपौर्णिमा

गुरू पूजा विधी – विधान | गुरू अपार गुणनिधान ||
स्वर्गाहून गुरु महान | वंदावे तेची पाय ||

गुरुपौर्णिमा… गुरू आणि शिष्याच्या पवित्र नात्याचा हा सण… यादिवशी शिष्य आपल्या गुरूविषयीची कृतज्ञता व्यक्त करतो. अगदी प्राचीन काळापासून ही प्रथा चालत आली आहे. आजच्या युगात देखील हा सण मनोभावे साजरा केला जातो. या दिवशी अनेक भक्तगण सद्गुरूंच्या मठात जाऊन गुरूंच्या चरणी नतमस्तक होतात. परंतु सानिका केअरटेकरच्या संचालिका सानिका तुळसकर यांनी एक अनोखी गुरुपौर्णिमा साजरी केली आहे. जी सर्वांमध्ये कौतुकाचा विषय ठरली आहे.

सानिका तुळसकर यांनी आजवर दिव्यांग विद्यार्थी तसेच दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत. सानिका केअरटेकरच्या माध्यमातून त्यांनी अनेक निराधार व्यक्तींची सेवा केली आहे. त्यांच्या आधाराची त्या जणू काठीच बनल्या आहेत.

आजचा गुरुपौर्णिमेचा सण त्यांनी आश्रमातील निराधार व्यक्तींसोबत साजरा केला. यावेळी या निराधार व्यक्तींसाठी त्यांनी स्वतःच्या हाताने जेवण बनवले. यानंतर सर्वांचे औक्षण करून त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्या निराधार वृद्धांच्या डोळ्यातील आनंद पाहून मिळणारे समाधान पैशात विकत घेण्यासारखे नव्हते.

आजच्या दिवशी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाल्यासारखं वाटतंय अशी प्रतिक्रिया सौ. सानिका तुळसकर यांनी दिली. तसेच आजची गुरुपौर्णिमा आपल्या कायम स्मरणात राहील असे देखील त्या म्हणाल्या…

error: Content is protected !!