देवगड तालुक्यातील पडवणे येथील घटना
देवगड : तालुक्यातील पडवणे समुद्रकिनारी एका २५ वर्षीय अनोळखी युवतीचा मृतदेह काल सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात करण्यात आली असून परिसरात खळबळ उडाली आहे.
पडवणे समुद्रकिनारी एका युवतीचा मृतदेह असल्याची माहिती स्थानिक नागरिक शैलेश लवू चौगुले यांनी गावच्या पोलीस पाटील समृद्धी समीर परकर यांना फोनद्वारे दिली. ही माहिती पोलीस पाटील यांच्यामार्फत देवगड पोलीस स्थानकाला मिळाल्यानंतर देवगडचे पोलीस निरीक्षक शाम बुवा, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे आणि हवालदार आशिष कदम यांनी तातडीने घटनास्थळी जात पंचनामा केला. मृत युवतीचे वय सुमारे २५ वर्षे असून उंची साडेचार फूट आहे. तिचे केस बांधलेल्या अवस्थेत होते. अंगात गुलाबी रंगाचा पूर्ण हाताचा टॉप आणि निळसर रंगाची जीन्स पॅण्ट होती, तसेच पायात जांभळ्या-पांढऱ्या रंगाचे बूट होते. या घटनेची फिर्याद पोलीस पाटील समृद्धी परकर यांनी दिली असून, संबंधित अनोळखी मृत युवतीबाबत कोणतीही माहिती असल्यास देवगड पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे करीत आहेत.


Subscribe










