रेल्वे तिकिटांचा काळाबाजार

एकावर कारवाई; गुन्हा दाखल

कुडाळ : मोठ्या संख्येने रेल्वे तिकीटे खरेदी करून ती ग्राहकांना जादा दराने विकून तिकीटांचा काळाबाजार करताना आढळलेल्या एकावर रेल्वे पोलिसांनी आज कारवाई केली. कुडाळ रेल्वे स्थानकात सकाळी ११.१५ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी मारुती दशरथ ठाकूर (५५, रा. नेरुर – कुडाळ) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रत्नागिरी रेल्वे सुरक्षा बलाची (आरपीएफ) अपराध शाखा व कणकवली रेल्वे सुरक्षा बल यांनी एकत्रितरित्या केली.

संशयित मारुती ठाकूर हा कुडाळ रेल्वे स्टेशन येथील आरक्षण केंद्रावर सातत्याने येत असे याबाबत आरपीएफच्या पथकाला संशय आल्याने पथकाने रत्नागिरी आरपीएफ येथील अपराध शाखेला कळवले. त्यानुसार रत्नागिरी आरपीएफची अपराध शाखा व कणकवली आरपीएफची टीम यांनी एकत्रितरित्या कुडाळ रेल्वे स्टेशन गाठले. तेथील तपासणीत मारुती ठाकूर हा काळाबाजार करण्यासाठी अधिकची तिकिटे घेत होता, अशी बाब निष्पन्न झाली. त्यानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कणकवली येथील आरपीएफचे निरीक्षक राजेश सुरवाडे करीत आहेत.

error: Content is protected !!