विविध विषयांवर होणार मार्गदर्शन
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे आयोजन
कुडाळ : ग्राहक केंद्रबिंदू मानून कार्य करणाऱ्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासाठी जिल्हास्तरीय एक दिवसीय ग्राहक कार्यकर्ता प्रबोधन कार्यशाळा गुरूवार दिनांक २३ एप्रिल रोजी कुडाळ येथे आयोजित करण्यात आली आहे. संस्थेचे राज्य सचिव अरूण वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली हि कार्यशाळा होणार असून जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे या कार्यशाळेचे उद्घाटक आहेत.
येथील मराठा समाज हॉल मध्ये गुरुवार दि. २३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजल्यापासून कार्यशाळेला सुरुवात होईल. या कार्यशाळेला महावितरण सिंधुदुर्गचे अधिक्षक अभियंताअभिमन्यू राख आणि कुडाळचे तहसिलदार सचिन पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. संस्थेचे राज्य संघटक सर्जेराव जाधव, कोषाध्यक्ष श्रीम. सुनिता राजेघाटगे, सहसचिव प्रा. सुरेश पाटील, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे माजी अध्यक्ष कमलाकात कुबल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यशाळेत सर्जेराव जाधव हे ‘शेतकरी ग्राहक प्रबोधन’, प्रा.सुरेश पाटील हे ‘ग्राहक पंचायतीची रचना व कार्यपद्धती’, श्रीम. सुनिता राजेघाटगे या ‘संस्था निधी संकलन व विनियोग’, श्रीम. श्रद्धा कदम या ‘सजग विद्यार्थी ग्राहक अभियान’ यावर मार्गदर्शन करणार आहेत. तर कमलाकांत कुबल व श्रीम. वफा खान या ‘जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाची कार्यपद्धती’ यावर मार्गदर्शन करतील. तसेच सायबर गुन्हे शाखा यांच्या वतीने ‘सायबर सुरक्षा’ या विषयांवर मार्गदर्शन होणार आहे.
या कार्यशाळेला संस्थेचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड, जिल्हा अध्यक्ष प्रा.सुरेश पाटील व कुडाळ तालुका अध्यक्ष प्रदिप शिंदे यांनी केले आहे.


Subscribe










