सिंधुदुर्ग : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दशावतार कलाकारांसाठी अधिकृत ओळखपत्र (आयडी कार्ड) तयार करण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वेक्षण आणि नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अधिकारी जिल्ह्यात दाखल झाले असून दि. १५ जुलै २०२६ ते दि. ३० जुलै २०२६ या कालावधीत तालुकानिहाय सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
या सर्वेक्षणासाठी आवश्यक असलेले नोंदणी फॉर्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समिती कार्यालयात पूर्णपणे निशुल्क उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या फॉर्मसाठी कोणत्याही कलाकाराकडून किंवा प्रतिनिधीकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
तालुकानिहाय सर्वेक्षणाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :
देवगड : दि. १५, १६ व १७ जुलै
कणकवली : दि. २० ते २२ जुलै
वैभववाडी : दि. २३, २४ व २७ जुलै
मालवण : दि. २८, २९ व ३० जुलै
कुडाळ : दि. १५, १६ व १७ जुलै
वेंगुर्ला : दि. २० ते २२ जुलै
सावंतवाडी : दि. २३, २४ व २७ जुलै
दोडामार्ग : दि. २८, २९ व ३० जुलै
सर्वेक्षणासाठी सहाय्यक संचालक, अधीक्षक व लिपिक-टंकलेखक दर्जाचे अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून ते संबंधित पंचायत समिती कार्यालयांमध्ये कार्यालयीन वेळेत उपस्थित राहून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणार आहेत.
दशावतार कलाकारांनी आपल्या तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयातून मोफत सर्वेक्षण फॉर्म घेऊन आवश्यक माहिती भरून आपली नोंदणी करावी व या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत करण्यात आले आहे.


Subscribe










