निरवडे येथे दोन गटात हाणामारी

११ जणांवर सावंतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

सावंतवाडी: सावंतवाडी तालुक्यातील निरवडे झरबाजार येथे सोमवारी सायंकाळी जुन्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. या वादाचे रूपांतर लाथाबुक्क्या, थापटाने आणि लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत झाले. या हिंसक घटनेत दोन्ही गटांतील लोक जखमी झाले असून, त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. घटनेनंतर दोन्ही बाजूंनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या आहेत.

पहिल्या गटाचे फिर्यादी चेतन गोविंद गावडे (रा. निरवडे देऊळवाडी) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी लक्ष्मण मोहन गावडे, श्रीमती लक्ष्मण गावडे, शिवाजी सुरेश गावडे, चंद्र धारगळकर आणि सुनील सावंत यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे करत आहेत. किरकोळ वादातून ही मारहाण सुरू झाल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर आले आहे.

दुसरीकडे, दुसऱ्या गटातील श्रीमती लक्ष्मण गावडे (रा. निरवडे माळकरवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचे दीर शिवाजी गावडे यांना होत असलेली मारहाण सोडवण्यासाठी त्या गेल्या असता, विरोधकांनी त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. या तक्रारीवरून पोलिसांनी लाडू गावडे, सीताराम गावडे, चेतन गावडे, गुरुनाथ गावडे, उमाकांत गावडे आणि नीलेश शिरोडकर या सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार हनुमंत धोत्रे करत असून, पोलिसांनी दोन्ही गटांतील एकूण ११ जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

error: Content is protected !!