कणकवलीच्या विकासासाठी ११:४० कोटींचा निधी

भव्य व्यापारी संकुलही उभारणार

नगराध्यक्ष संदेश पारकर यांची पत्रकार परिषदेत माहिती

कणकवली : कणकवली शहराच्या विकासाला गती देण्यासाठी राज्य शासनाकडून तब्बल ११ कोटी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून या निधीतून अत्याधुनिक प्रसाधनगृह, प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण तसेच शहरात आधुनिक व्यापारी संकुल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही माहिती कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी कणकवली नगरपंचायतीतील नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी त्यांच्यासोबत उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक संकेत नाईक, जयेश धुमाळे, सत्यजित पारकर, जाई मुरकर, लुकेश कांबळे, दीपिका जाधव, सुमेधा अंधारी आदी उपस्थित होते.

पुढे श्री. पारकर म्हणाले की, नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सत्ताधारी व विरोधी पक्षातील नगरसेवकांनी विविध विषयांवर सकारात्मक चर्चा केली. नागरिकांच्या समस्यांवर प्रशासनानेही समाधानकारक उत्तरे दिली असून शहराच्या विकासासंदर्भातील अनेक महत्त्वाचे निर्णय सभेत घेण्यात आले. शहराच्या विकासासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध झाला आहे. वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत एसटी स्थानकासमोरील अद्ययावत प्रसाधनगृहासाठी १ कोटी ५० लाख रुपये मंजूर झाले असून निविदा प्रक्रिया पूर्ण होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

याशिवाय रस्ता अनुदान योजनेंतर्गत ९ कोटी ९० लाख रुपये मंजूर झाले आहेत. या निधीतून मुख्य बाजारपेठेतील रस्ता, पटकीदेवी ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६, पटवर्धन चौक ते लक्ष्मी चित्रमंदिर (पोलीस स्टेशन) आणि कांबळे गल्ली ते जानवली नदी गणपती स्थान या चार प्रमुख रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या सहा महिन्यांत नगरपंचायतीने विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. नुकतेच १४ विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. स्वयंभू नमो उद्यान, नाका चौकाचे सुशोभीकरण तसेच उड्डाणपुलाखालील ४४ खांबांचे आकर्षक सुशोभीकरण करण्यासाठी सुमारे ४० ते ५० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.

पत्रकार परिषदेत बोलताना पारकर यांनी शहरातील जुन्या भाजी मार्केटच्या पुनर्विकासाची योजनाही जाहीर केली. जीर्ण झालेल्या भाजी मार्केटच्या जागी आधुनिक व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. महसूल विभागाची जागा आणि नगरपंचायतीची आरक्षित जागा मिळून सुमारे ४० ते ५० गुंठ्यांवर हे संकुल उभारण्यात येणार आहे. या संकुलात भाजी, फळ व फुल मार्केट, व्यापारी गाळे, प्रशस्त पार्किंग तसेच अतिक्रमण हटाव मोहिमेत विस्थापित झालेल्या स्टॉलधारकांसाठीही जागा उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच डीपी रोडवरील नव्या भाजी मार्केटच्या उर्वरित कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तेही लवकरच नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करण्यात येणार असल्याचे सांगत, कणकवली शहराचा सर्वांगीण व नियोजनबद्ध विकास हेच नगरपंचायतीचे ध्येय असल्याचा विश्वास नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!