उपोषणाला तात्पुरती स्थगिती
प्रशासनाच्या विनंतीनंतर नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा निर्णय
चुकीची नोंदणी आढळल्यास पुन्हा लोकशाही मार्गाने आवाज उठवणार
कणकवली : कणकवली शहरातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षणाच्या (SIR) प्रक्रियेत अपात्र व बेकायदेशीर मतदारांची नोंदणी होऊ नये, यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून आपण सातत्याने आवाज उठवत आहोत. याबाबत तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी तसेच निवडणूक आयोगाकडे जवळपास पाच वेळा पत्रव्यवहार करून विविध त्रुटी निदर्शनास आणून दिल्या आहेत. मात्र पात्र मतदारांची नोंदणी झालीच पाहिजे, हीदेखील आमची ठाम भूमिका आहे, असे नगराध्यक्ष संदेश पारकर स्पष्ट केले.
कणकवली नगरपंचायतमध्ये आयोजित पत्रकार
परिषदेत नगराध्यक्ष संदेश पारकर बोलत होते. यावेळी नगरसेवक संकेत नाईक, लूकेश कांबळे, जयेश धुमाळे, सत्यजित पारकर आदी उपस्थित होते.
पुढे श्री. पारकर म्हणाले, १५ ऑगस्ट रोजी झेंडावंदनानंतर उपोषण करण्याची भूमिका आपण घेतली होती. मात्र जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनी केलेल्या विनंतीनंतर हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली असली तरी मतदार यादीच्या शुद्धीकरणाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही.
SIR प्रक्रियेत रहिवास व वास्तवाचा पुरावा, पंचयादी तसेच शहरात वास्तव्यास नसलेल्या किंवा प्रत्यक्ष शोधूनही न सापडणाऱ्या मतदारांची नोंदणी कशा पद्धतीने होत आहे, याबाबत आपण सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. कणकवली नगरपंचायतीच्या १७ वॉर्डापैकी ७ बुथशी संबंधित सुमारे ७३३ आक्षेपार्ह मतदारांची यादी प्रशासनाकडे देण्यात आली असून, उर्वरित आक्षेपही १७ ऑगस्टपर्यंत सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार सध्या मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे. बीएलओंकडून अर्ज भरून घेतले जात असून, प्रत्यक्ष घरभेटी देऊन मतदारांचे वास्तव्य, रहिवास आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतर प्रसिद्ध होणाऱ्या मतदार यादीवर नागरिकांना आक्षेप व हरकती नोंदविण्याची संधी मिळणार आहे.
माझ्या शहरातील रहिवासी हाच माझ्या शहराचा मतदार असावा, हीच आमची भूमिका आहे. पात्र मतदारांबाबत आमचा कोणताही आक्षेप नाही. मात्र अपात्र आणि बेकायदेशीर मतदारांची नोंदणी होऊ नये, यासाठीच आमची ही लढाई आहे, असे श्री. पारकर यांनी सांगितले.
यापुढे निवडणूक आयोगाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमावर आपण बारकाईने लक्ष ठेवणार आहोत. या प्रक्रियेत चुकीची, अयोग्य अथवा बेकायदेशीर नोंदणी आढळल्यास संबंधित बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात येईल. आवश्यक असल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याबरोबरच लोकशाही मार्गाने पुन्हा आंदोलन आणि उपोषण केले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.


Subscribe









