वाळूने भरलेल्या ६ होड्या पकडल्या
मालवण : कालावल खाडीपात्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उत्खननावर महसूल विभागाने गुरुवारी जोरदार कारवाई करत ६ होड्या जप्त केल्या. तहसीलदार गणेश लव्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कोळंब, आचरा आणि मसुरे येथील मंडळ अधिकाऱ्यांच्या पथकाने ही मोहीम राबवली. प्रशासनाचे पथक पुलावर पोहोचताच वाळू माफियांची मोठी पळापळ झाली; अनेक कामगारांनी कारवाई टाळण्यासाठी होड्या खाडीच्या मध्यभागी नेल्या आणि पाण्यात उड्या मारून पळ काढला.
या कारवाई दरम्यान किनाऱ्यावर सापडलेल्या ३ होड्या महसूल विभागाने जप्त करून स्थानिक पोलीस पाटलांच्या ताब्यात दिल्या आहेत. कोथेवाडी आणि गावकरवाडा परिसरात सुमारे साडेचार ब्रास वाळू आणि उत्खननाचे साहित्य पथकाने हस्तगत केले. तसेच, खाडीकिनारी अनधिकृतपणे उभारण्यात आलेल्या रॅम्पच्या मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या असून, पुन्हा असे रॅम्प आढळल्यास थेट गुन्हे दाखल करण्याचा कठोर इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
मात्र, या कारवाईवेळी बंदर विभागाकडे स्वतःची बोट उपलब्ध नसल्याने खाडीच्या मध्यभागी असलेल्या होड्यांवर कारवाई करताना पथकाला मर्यादा आल्या. शासनाकडून वाळू चोरी रोखण्यासाठी अनेक योजना आखल्या जात असल्या तरी, साधनसामग्रीच्या अभावामुळे प्रत्यक्ष कारवाईत अडचणी येत असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. दरम्यान, पळून गेलेल्या परप्रांतीय कामगारांवर कारवाई करण्यासाठी आता पोलीस प्रशासनाची मदत घेतली जाणार आहे.


Subscribe










