अभ्यासाच्या तणावातून तेंडोली येथील १९ वर्षीय कॉलेज तरुणीची आत्महत्या

कुडाळ: कुडाळ तालुक्यातील तेंडोली-आंबेडकरनगर येथील वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षात शिकणाऱ्या १९ वर्षीय अदिती दत्ताराम तेंडोलकर या तरुणीने राहत्या घरात साडीच्या साहाय्याने गळफास लावून आपले जीवन संपवले. अभ्यासाच्या मानसिक तणावातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समजते. या दुर्दैवी घटनेची माहिती गणपत शांताराम तेंडोलकर यांनी दिल्यानंतर निवती पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, संत राऊळ महाराज महाविद्यालयात तेरावीत (एफ.वाय.बी.कॉम.) शिकणारी अदिती अभ्यासात हुशार होती. १३ ऑगस्ट रोजी ती नेहमीप्रमाणे कॉलेजसाठी निघाली होती, मात्र अर्ध्या रस्त्यातूनच ती घरी परतली आणि दिवसभर घरातच थांबली. त्या दिवशी तिचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले असल्याने घरात कोणीही उपस्थित नव्हते. या दरम्यान सायंकाळच्या सुमारास तिने बेडरूममधील लाकडी बाराला साडी बांधून गळफास घेतला.


वडील कामावरून परत आल्यावर घराचे दरवाजे आतून बंद आढळले. आवाज देऊनही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता, बेडरूममध्ये अदिती गळफास लावलेल्या अवस्थेत दिसून आली. निवती पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण केली. अदितीच्या पश्चात आई, वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे.

error: Content is protected !!