वेंगुर्ला येथे घरफोडीचा गुन्हा २४ तासाच्या आत उघडकीस

तब्बल १५,९७०००/- किमतीचे ३१.५ तोळे वजनाचे दागिने गेले होते चोरीस

वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील आडारी, टेंबवाडी येथे झालेल्या घरफोडीचा छडा अवघ्या २४ तासांच्या आत लावण्यात आला. या घरफोडीमध्ये अज्ञात चोरट्यांनी १५,९७०००/- किमतीचे ३१.५ तोळे वजनाचे दागिने चोरून नेले होते. स्थानिक गुन्हा अन्वेषण सिंधुदुर्ग व वेंगुर्ला पोलिसांनी ही एकत्रित कारवाई केली.

सदर गुन्हा आडारी, टेंबवाडी येथे १७ जुलै २०२६ रोजी सायं ५.३० ते १४ ऑगस्ट २०२६ रोजी सायं ३.३० या कालावधीत घडला असून याची फिर्याद १४ ऑगस्ट २०२६ रोजी रात्रौ. ९.२५ वाजता वेंगुर्ला पोलीस ठाण्यात देण्यात आली. सदर गुन्ह्यात फिर्यादी यांच्या राहत्या घराच्या दर्शनी दरवाजाची कडी तोडून घरफोडी करण्यात आली होती.

या गुन्ह्यामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग व वेंगुर्ला पोलीस यांच्याकडून करण्यात आलेल्या एकत्रित तपासात घटनास्थळी मिळून आलेल्या अंगुली मुद्रणावरून अंगुलीमुद्रा विश्लेषक श्री. मागाडे यांनी अथक प्रयत्न करून एका विधीसंघर्षग्रस्त बालकास निष्पन्न केले. त्यानुसार त्याच्या राहत्या परिसरातून त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले. सदर घरफोडीबाबत त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार उमेश प्रल्हाद पेडणेकर (१८) रा. उभादांडा आडारी, ता. वेंगुर्ला याच्यासोबत गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यानुसार त्यांच्यावर भा.न्या.सं. कलम 305 (अ), 331(3), 331(4) अंतर्गत कारवाई करण्यात आली.

चोरीस गेलेल्या दागिन्यांपैकी ११ तोळे सोने हस्तगत काण्यात आले असून उर्वरित दागिन्यांपैकी काही दागिने त्यांनी सोनाराला विकल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार, एक लोखंडी हातोडा, एक लोखंडी पारई हस्तगत करण्यात आली असून उर्वरित दागिन्यांबाबत पुढील तपास सुरू आहे.

सदरची कारवाई मा.श्री.मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, मा. कु. नयोमी साटम, अप्पर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या सुचनेनुसार व मार्गदर्शनाखाली
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.प्रवीण कोल्हे,पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ , सहा.पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, हेड कॉन्स्टेबल विल्सन डिसोझा,आशिष जामदार, पोलिस कॉन्स्टेबल महेश समजिस्कर,अमर कांडर तसेच वेंगुर्ला पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निसर्ग ओतारी,पोलिस उपनिरीक्षक शेखर दाभोळकर,हेड कॉन्स्टेबल योगेश सराफदार,पोलिस कॉन्स्टेबल जयेश सरमळकर,मनोज परोळकर, आकाश घाटगे,पंकज पाटील यांच्या पथकाने केलेली आहे.

error: Content is protected !!