१८ ऑगस्ट रोजी जि.प. उपाध्यक्षांच्या दालनात बैठकीचे आयोजन
हायवे ते विद्याप्रसाद कॉलनी या रस्त्याची झालेली दुरवस्था तसेच कॉलनीतील सहा अर्धवट विकासकामे याकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी आंदोलन केले होते. या आंदोलनाची जि.प. प्रशासन व प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.
चंद्रकांत अणावकर व प्रकाश सावंत यांनी रस्त्यावरील डांब्यावर बसून ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीबद्दल निषेध नोंदविला. यावेळी जि.प. उपाध्यक्ष मान. दादा साईल, माजी जि.प. अध्यक्षा सौ. दीपलक्ष्मी पडते, कुडाळचे गटविकास अधिकारी, पं.स.चे ग्रामपंचायत विस्तार अधिकारी, पिंगुळीचे सरपंच मान. सत्यवान आकेकर, ग्रामविकास अधिकारी निवतकर, ग्रामपंचायत सदस्य शशांक पिंगुळकर, पिंगुळीचे सर्कल अधिकारी व तलाठी, पोलीस अधिकारी संजय कदम व दोन पोलीस तसेच डॉ. गोरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली.
यावेळी विद्याप्रसाद कॉलनी व माजी गणेश कॉलनीतील प्रतिनिधी राजन कोरगावकर, चित्तरंजन सावंत, प्रशांत बजराटकर, गणपत दळवी, संभाजी तीर, धोंडू रेडकर, मिथुन बजराटकर, दत्तात्रय शिरसाट, सानिका तळेकर, स्नेहल गावडे, नूतना अणावकर, आरती शिरसाट, रोहिणी तीर, अर्पणा रेडकर, संजना गोसावी आदी नागरिक आंदोलनस्थळी उपस्थित होते.
मान. दादा साईल, मान. दीपलक्ष्मी पडते, कुडाळ गटविकास अधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्यांच्या समस्या समजून घेतल्या. रस्ता व अर्धवट असलेली विकासकामे यावर चर्चा करून ठोस कार्यवाही करण्यासाठी जि.प. उपाध्यक्ष मान. दादा साईल यांनी मंगळवार, दि. १८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजता अधिकारी व कॉलनीतील प्रतिनिधी यांची आपल्या दालनात बैठक आयोजित केली आहे.
या बैठकीत लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन सर्व प्रश्न जाणून घेतले असून योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. याबद्दल चंद्रकांत अणावकर व प्रकाश सावंत यांनी सर्वांचे आभार मानले. त्यांच्या विनंतीला मान देऊन आंदोलन समाप्त करण्यात आले.


Subscribe










