कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर वेताळबांबर्डे पुलानजिक एका कारला अपघात होऊन ती सखल भागात जाऊन पलटी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसून कारचे मात्र नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कार मुंबईहून गोव्याकडे जात होती. वेताळबांबर्डे पुलाजवळ कार पोहोचली असता तेथील अरुंद लेनचा चालकाला अंदाज न आल्याने कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार महामार्गालगत असलेल्या सखल भागात जाऊन पलटी झाली.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने कारमधील प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
दरम्यान, याच ठिकाणी आठ दिवसांपूर्वीही अशाच प्रकारचा अपघात घडल्याने या परिसरातील रस्त्याच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.