कुडाळ नाबरवाडी अपघात; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

कुडाळ | प्रतिनिधी

कुडाळ नाबरवाडी येथे झालेल्या भीषण अपघातात नेरूर येथील नीलिमा निलेश मेस्त्री यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असून, संबंधित उपअभियंता व शाखा अभियंता यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी आक्रमक मागणी जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी केली आहे.

सोमवारी रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची भेट घेतली. नाबरवाडी येथील अपघाताच्या ठिकाणी रस्त्यावर झुकलेली सुरूची झाडे आणि खराब साईडपट्टीमुळेच हा अपघात घडल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. “अनेक दिवसांपासून ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी झाडे काढण्याची मागणी करत होते, मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. या निष्काळजीपणामुळेच एका निष्पाप महिलेला जीव गमवावा लागला,” असे पावसकर यांनी निवेदनात म्हटले आहे.

पोलीस स्थानकातील भेटीनंतर संतप्त नागरिकांनी कुडाळ येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी कार्यालयात एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने वातावरण अधिकच तापले. रुपेश पावसकर यांनी तातडीने कार्यकारी अभियंता श्रीमती इंगवले यांच्याशी फोनवरून संपर्क साधून त्यांना धारेवर धरले.

कुडाळ शहर ते नेरूरपार ब्रिज आणि जकात नाका ते कवठी रस्त्यावरील धोकादायक झाडे तातडीने हटवणे, रस्त्यावरील जीवघेणे खड्डे त्वरित भरणे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली. अपघाताला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणे. या चर्चेअंती, कार्यकारी अभियंत्यांनी ११ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता स्वतः उपस्थित राहून प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आणि आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

या आंदोलनात पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे, शिवसेना शहर निरीक्षक सुशिल चिंदरकर, नितीन सावंत, प्रविण नेरूरकर, देवीदास नाईक, बाळा पावसकर, शंभुराजे नाईक, गोटू नाईक, अमोल शृंगारे, नारिंग्रेकर यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

error: Content is protected !!