डिंगणी :आज गुरुवार, दि. २८ नोव्हेंबर रोजी डिंगणी गुरववाडी केंद्रातील सर्व जि. प. शाळांची शिक्षण परिषद संपन्न झाली. परिषदेचे अध्यक्षस्थान केंद्रप्रमुख संतोष मोहिते यांनी भूषवले. खाडेवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी इशस्तवन, स्वागतगीत व शालेय परिपाठाच्या माध्यमातून वातावरण निर्मिती केली. तर मोहिते सर यांनी या परिषदेचे महत्त्व आपल्या प्रास्ताविकातून विषद केले.यानंतर राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणाची पूर्वतयारीबाबत योगेश मुळे यांनी मार्गदर्शन केले.
अजिंक्य नाफडे यांनी हॅकेथॉन व कॉम्प्युटर सायन्स व कोडिंग कोर्स रजिस्ट्रेशन संदर्भात पीपीटीद्वारे माहिती दिली. विद्यार्थ्यांना त्यांचे करिअर निवडण्यात करावयाच्या मार्गदर्शनात शाळा, शिक्षक यांची भूमिका कशी असावी हे युवराज पाटील यांनी स्पष्ट केले.यानंतर शालेय, केंद्रस्तरीय क्रीडास्पर्धांचे नियोजन करण्यात आले. तसेच त्यानंतर होणाऱ्या स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासंदर्भात निकषांवर सविस्तर मार्गदर्शन मोहिते सर यांनी केले. इयत्ता ५ वी स्कॉलरशिप परीक्षा नियोजन व प्रशासकीय मार्गदर्शन करण्यात आले. मदन वाजे यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली. तर मुख्याध्यापक रमेश मणवे यांनी आभारप्रदर्शन करून कार्यक्रमाचा समारोप केला.













