नागवे ग्रामस्थांचा पहिल्यांदाच सहपरिवार देवता दर्शन सोहळा
कणकवली/वार्ताहर
कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र कुणकेश्वरच्या चरणी यावर्षी एक ऐतिहासिक सोहळा रंगणार आहे. नागवे गावचे ग्रामदैवत श्री देव नागेश्वर आपल्या संपूर्ण देव-परिवार, पंचतरंग आणि लवाजम्यासह रविवार १५ फेब्रुवारी (महाशिवरात्री) रोजी श्री देव कुणकेश्वर महास्थानच्या भेटीला जाणार आहेत.
नागवे ग्रामस्थांच्या इतिहासात प्रथमच हा नयनरम्य सोहळा संपन्न होत असल्याने संपूर्ण पंचक्रोशीत भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. या यात्रेच्या पूर्वतयारीसाठी नुकतीच श्री देव नागेश्वर मंदिरात ग्रामस्थांची संयुक्त सभा पार पडली. यावेळी ७० हून अधिक स्थानिक व मुंबईस्थित ग्रामस्थांनी उपस्थित राहून यात्रेचा आराखडा निश्चित केला. प्रवासाची व्यवस्था, राहण्याची सोय आणि भोजन व्यवस्थेबाबत चोख नियोजन करण्यात आले आहे.
नागवे गावच्या देवता प्रथमच अधिकृतपणे श्री देव कुणकेश्वर भेटीला प्रस्थान करणार आहेत. हा दर्शन सोहळा १५ ते १७ फेब्रुवारी असा तीन दिवस चालणार असून, यामध्ये हजारो भाविक सहभागी होणार आहेत. रविवार १५ फेब्रुवारीला दुपारी १२ वा. श्री देव नागेश्वर मंदिरातून श्री देव कुणकेश्वर दर्शन यात्रेचा प्रारंभहोणार आहे. १५ व १६ फेब्रुवारीला तीर्थक्षेत्री वास्तव असणार आहे. मंगळवार १७फेब्रुवारी रोजी पहाटे देवतांचे व भाविकांचे पवित्र तीर्थस्नान होऊन श्री देव कुणकेश्वर दर्शन होईल. त्यानंतर दुपारी भाविकांचा महाप्रसाद झाल्यानंतर श्री देव नागेश्वर सह परिवार देवता, पंचतरंग व भाविकांसह नागवे गावी रवाना होतील. यात्रेची सांगता श्री देव नागेश्वर मंदिरात होणार आहे. यात्रेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक भाविकाला श्री देव कुणकेश्वर दर्शनासाठी श्री देव नागेश्वर देवस्थानचा विशेष ‘बिल्ला’ आणि ‘टोपी’ देण्यात येणार आहे.
आपल्या देवतांसोबत चालणे हा भाग्याचा ठेवा आहे. या यात्रेदरम्यान सर्व भाविकांनी गावाची आणि देवस्थानची प्रतिष्ठा जपून शिस्तबद्ध रीतीने दर्शन घ्यावे, असे आवाहन श्री देव नागेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट व मानकरी यांच्यावतीने करण्यात आले आहे.


Subscribe






