दोडामार्ग तालुक्यातील घटना
आत्महत्येपूर्वी लिहून ठेवली होती चिठ्ठी
दोडामार्ग : तालुक्यातील परमे फणसवाडी येथील १९ वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. गौरी नंदकिशोर सुतार असे या मृत तरुणीचे नाव असून ती कुडाळ तालुक्यातील पणदूर येथील एका नर्सिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, गौरीचे वडील सुतारकाम करतात तर आईने हॉटेलमध्ये कष्ट करून तिला शिक्षणासाठी पाठबळ दिले होते. आज दुपारी घरात कोणीही नसताना गौरीने गळफास लावून आपले जीवन संपवले. दुपारी तिचा लहान भाऊ कॉलेजवरून घरी परतला असता, ही हृदयद्रावक घटना त्याच्या निदर्शनास आली. त्याने तातडीने आरडाओरड करून आजूबाजूच्या लोकांना बोलावले.
रुग्णालयात मयत घोषित
ग्रामस्थांच्या मदतीने तिला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी मृतदेह नेण्यात आला. यावेळी परमे परिसरातील ग्रामस्थांनी मो केली होती.
सुसाईड नोटमध्ये काय?
गौरीने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामध्ये तिने नमूद केले आहे की, “मी माझ्या स्वतःच्या जीवनाला कंटाळून आत्महत्या करत आहे. याबाबात माझी कोणाविरुद्धही तक्रार नाही.” एका उमद्या आणि उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणीने अशा प्रकारे जीवन संपवल्यामुळे संपूर्ण परमे गावावर शोककळा पसरली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.


Subscribe









