मुंबई-गोवा महामार्गावर २४ लाखांच्या मुद्देमालासह दारूने भरलेला डंपर जप्त!

कुडाळ पोलिसांची मोठी कारवाई

कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावरील पिंगुळी टेंबधुरीनगर जवळ कुडाळ पोलिसांनी बेकायदा दारू वाहतूक करणाऱ्या एका डंपरवर धाडसी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १४ लाख २० हजार रुपयांच्या अवैध दारूसाठ्यासह १० लाखांचा डंपर आणि एक धारदार कोयता, असा एकूण २४ लाख २० हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी डंपरमधील दोन जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम, भारतीय न्याय संहिता (BNS), मोटार वाहन कायदा, शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २८) रात्री पोलिसांचे पथक मुंबई-गोवा महामार्गावरील बिबवणे येथे तैनात होते. यादरम्यान गोव्याहून कुडाळच्या दिशेने येणाऱ्या एका डंपरला (क्रमांक MH 07 C 6737) पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने डंपर न थांबवता तो भरधाव वेगाने पळविण्याचा प्रयत्न केला. संशय आल्याने पोलिसांनी तातडीने त्याचा थरारक पाठलाग केला आणि पिंगुळी टेंबधुरीनगर येथे डंपरला यशस्वीरी्या अडवले. डंपरची तपासणी केली असता, त्यात पोलिसांना वेगवेगळ्या नामांकित ब्रँडच्या बेकायदा दारूच्या बाटल्यांचे बॉक्स आढळून आले.
ही धडक कारवाई कुडाळचे प्रभारी पोलीस निरीक्षक जयदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या विशेष पथकाने केली आहे. महामार्गावरून होणाऱ्या या मोठ्या दारू तस्करीचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून, या कारवाईमुळे अवैध व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत. जप्त केलेला मुद्देमाल कुडाळ पोलिसांनी ताब्यात घेतला असून, या प्रकरणाचा पुढील सखोल तपास कुडाळ पोलीस करत आहेत.

error: Content is protected !!