डॉ. कुबेर मिठारी यांना पुन्हा कळसुलीत नियुक्त करा; माजी सरपंच अतुल दळवी यांची मागणी

कणकवली : कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात तब्बल २० वर्षे दिवस-रात्र अविरत सेवा बजावणारे डॉ. कुबेर मिठारी यांनी “आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा” हा मंत्र अंगीकारून आपल्या सेवाकाळात अनेक रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा दिली. कळसुलीसह शिरवल, हळवल, कसवण-तळवडे, बोर्डवे, वागदे, ओसरगाव आदी गावांमध्ये त्यांनी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवला.

डॉ. मिठारी यांची कळसुली येथून बदली झाल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवा विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून येत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. याबाबत अनेक वेळा प्रशासनाकडे नवीन वैद्यकीय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली. मात्र, अद्यापही योग्य तो निर्णय न झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना आरोग्यसेवेसाठी अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

दरम्यान, कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रात पुन्हा डॉ. कुबेर मिठारी यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी माजी सरपंच अतुल दळवी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

error: Content is protected !!