दुचाकीस्वार ट्रॅक्टरच्या चाकावर जाऊन आदळला
दोडामार्ग : येथील बाजारपेठेत आज दुपारी थरारक आणि विचित्र अपघात घडला. दोन मोठ्या वाहनांच्या मधून रस्ता काढणाऱ्या एका स्कूटरला मागून येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून, सुदैवाने तो मोठ्या अनर्थातून थोडक्यात बचावला आहे.
दोडामार्ग बाजारपेठेत एका बाजूला नगरपंचायतीचा कचरा गोळा करणारा ट्रॅक्टर उभा होता, तर दुसऱ्या बाजूला कोंबडी वाहतूक करणारा टेम्पो उभा होता. याच दरम्यान एक तरुण आपल्या स्कूटरने या दोन्ही गाड्यांच्या मधून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता. त्याच वेळी मागून वेगाने आलेल्या एका डंपरने स्कूटरला मागून धडक दिली. या धडकेमुळे दुचाकीस्वार थेट बाजूला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या चाकावर जाऊन आदळला आणि रस्त्यावर कोसळला. सुदैवाने ट्रॅक्टर उभा असल्याने तो चाकाखाली जाण्यापासून वाचला, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता असे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
अपघात घडताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच दोडामार्ग पोलिसांनी तातडीने धाव घेऊन परिस्थिती हाताळली. जखमी तरुणाला तात्काळ दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे. या अपघातात स्कूटर डंपरच्या खाली गेल्याने तिचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. भरवस्तीत झालेल्या या अपघातामुळे बाजारपेठेत काही काळ खळबळ माजली होती.


Subscribe









