कणकवली : कणकवली येथील सहयोगिनी सेवा मंडळ गेली अनेक वर्षे विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असून पर्यावरण संवर्धनाचा अनोखा आदर्शही त्यांनी समाजासमोर ठेवला आहे. चार वर्षांपूर्वी वागदे येथील श्री. उभादेव मंदिर परिसरात मंडळाच्या वतीने वडाचे रोपटे लावून वटपौर्णिमा साजरी करण्यात आली होती. आज त्या छोट्याशा रोपट्याचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले असून हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाचा प्रेरणादायी आदर्श ठरला आहे.
वडाच्या झाडाच्या फांद्या न तोडण्याचा संकल्प मंडळातील महिलांनी केला असून मुंबई-गोवा महामार्गालगत लावलेल्या वडाच्या झाडांची गेली चार वर्षे नियमित देखभालही त्या करत आहेत. यावर्षीही नवीन वडाचे रोप लावून पारंपरिक पद्धतीने वटपौर्णिमा साजरी करण्यात आली.
यावेळी सहयोगिनी सेवा मंडळाच्या अध्यक्षा दीपा दिलीप सरुडकर यांनी महिलांना आवाहन करताना सांगितले की, “वटपौर्णिमेच्या निमित्ताने वडाच्या झाडाच्या फांद्या तोडण्याऐवजी नवीन वडाचे रोप लावून त्याचे संवर्धन करण्याची परंपरा सर्वांनी जोपासावी. पर्यावरण संरक्षणासाठी हा छोटासा प्रयत्न भविष्यात मोठे योगदान देऊ शकतो.”
या प्रसंगी सहयोगिनी सेवा मंडळाच्या अध्यक्ष- दिपा सरूडकर
सचीव – स्मिता बुटाले, सदस्य स्वाती टकले, श्रद्धा उचले, सुहासिनी टकले, दीक्षा सावंत, आदीसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Subscribe









