बाजारपेठेत सापडली मोबाईल सहित बॅग
कुडाळ : तालुक्यातील ग्रामीण भागातील एक अल्पवयीन कॉलेज युवती बेपत्ता झाली आहे. या युवतीचे कुडाळ बाजारातील मध्यवर्ती ठिकाणी कॉलेज बॅग व मोबाईल सापडला असून ही बॅग त्या ठिकाणी या युवतीने स्वतःच ठेवून घाई गडबडीत तिथून निघून गेल्याचे तेथील सीसीटीव्ही कॅमेरा वरून दिसत असल्याची माहिती मिळाली आहे.
कुडाळ तालुक्यातील एका गावात राहणारी ही युवती सकाळी कॉलेज साठी कुडाळ येथे येण्यासाठी निघाली होती. दरम्यान दुपार झाली तरी ती युवती घरी परत आली नाही. त्यामुळे तिचा नातेवाईकांनी अनेक ठिकाणी शोध घेतला मात्र तिच्याबाबत कोणतीच माहिती मिळाली नाही. त्यामुळे अखेर कुडाळ पोलीस ठाणे गाठत आपली लेखी तक्रार दिली. दरम्यान कुडाळ शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मारुती मंदिर नजिक तिची बॅग सापडली आहे. या बॅगमध्ये तिचा मोबाईलही सापडला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने या भागातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये या ठिकाणी स्वतः बॅग ठेवून घाईगडबडीत जात असल्याचे दिसत आहे. यावरून ही बॅग तिने स्वतःच ठेवल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. मात्र ती अशी अचानक बेपत्ता होण्यामागे नेमके कारण अद्याप पर्यंत स्पष्ट होऊ शकली नाही. दरम्यान रात्री उशिरापर्यंत याबाबत तक्रार दाखल करण्याचे काम कुडाळ पोलीस ठाण्यात सुरू होते.

Subscribe





