आंदुर्ले : ग्रामपंचायत आंदुर्लेने सामाजिक बांधिलकी जपत जिव्हाळा आश्रमाला उपयुक्त साहित्य भेट देण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. कोव्हीड-१९ महामारीच्या काळात ग्रामफंड तसेच लोकसहभागातून ग्रामपंचायतीतर्फे २०२० साली १८ गादी, उशी आणि बेडशीट अशा प्रकारचे नवीन साहित्य खरेदी करण्यात आले होते. सध्याच्या परिस्थितीत हे साहित्य वापरात नसल्याने, ते पडून राहण्यापेक्षा गरजूंसाठी उपयुक्त व्हावे या उदात्त हेतूने ग्रामपंचायत कार्यकारिणीच्या निर्णयानुसार हे साहित्य जिव्हाळा सेवाश्रम, माड्याचीवाडी येथे भेट देण्यात आले.
या उपक्रमावेळी ग्रामपंचायत उपसरपंच श्री. चंद्रकीसन मोर्ये, ग्रामपंचायत कर्मचारी वासुदेव वझरकर, वासुदेव परब, योगेश राऊळ, हर्षद दाभोलकर तसेच ग्रामस्थ रघुनाथ सर्वेकर उपस्थित होते. या सामाजिक उपक्रमाबद्दल स्थानिक नागरिक व आश्रम व्यवस्थापनाने आंदुर्ले ग्रामपंचायतीचे मनःपूर्वक आभार मानले.