रिगल कॉलेजमध्ये चोरी

तब्बल ५ लाखांहून अधिक रक्कम चोरीला

कणकवली : जानवली येथील रिगल कॉलेजमध्ये अज्ञात चोरट्यांनी कपाटाचे कुलूप तोडून ५ लाख ४ हजार ६०१ रुपये रोख रक्कम चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कॉलेजच्या क्लार्कने याबाबत कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, वृषाली रुपेश परब (वय ३६, रा. फोंडाघाट बावीचे भाटले, ता. कणकवली) या रिगल कॉलेजमध्ये क्लार्क म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या फीची रक्कम आणि अकाउंटचे काम असते. १८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत त्यांनी कॉलेजच्या लॉकरमध्ये जमलेले एकूण ६,४२,१०१ रुपये क्लोज किर्दीमध्ये नोंद करून ठेवले होते. त्यातील २७,५०० रुपये त्यांनी कॉलेजच्या अकाउंटला जमा केले होते, तर उर्वरित ६,१४,६०१ रुपये कपाटात ठेवले होते.

१९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी २.०० वाजता कॉलेजचे क्लार्क राजेश परब यांनी वृषाली परब यांना फोन करून माहिती दिली की, रात्री कॉलेजच्या आवारात मानसी तेली आणि एक अनोळखी व्यक्ती फिरताना स्थानिक लोकांनी पाहिले आहे आणि त्या अनोळखी इसमास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामुळे वृषाली परब यांनी दुपारी ४.०० वाजता कॉलेजमध्ये येऊन कॅशची खात्री केली.

त्यांनी शिपाई पुरुषोत्तम कदम यांना चावी घेऊन बोलावले आणि क्लार्क राजेश परब तसेच त्यांचे पती रुपेश परब यांच्यासोबत ऑफिस उघडले. त्यांनी काम करत असलेल्या रुममधील लोखंडी कपाटाची पाहणी केली असता, ते कपाट कोणत्यातरी हत्याराने उचकटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेल्या ६,१४,६०१ रुपयांपैकी केवळ १,१०,००० रुपये त्यांना मिळून आले.

या धाडसी चोरीत चोरट्यांनी ५००, २००, १००, २०, १० रुपयांच्या नोटा आणि विविध कॉईन मिळून एकूण ५,०४,६०१ रुपये तसेच काळ्या रंगाचा एक पाऊच, ज्यामध्ये सारस्वत बँकचे २ पासबुक व बँक ऑफ इंडिया बँकेचे २ पासबुक होते, असा ऐवज चोरून नेला आहे. अज्ञात चोरट्याने १८ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपासून ते १९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजेच्या दरम्यान रिगल कॉलेजमधील कपाटाचा दरवाजा उचकटून ही चोरी केली आहे. वृषाली परब यांनी दिलेल्या तक्रारीवरून कणकवली पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

error: Content is protected !!