अल्पवयीन मुलीच्या खून प्रकरणातील संशयिताची पोलीस कोठडी २ दिवसांनी वाढवली

कुडाळ : कुडाळ तालुक्यातील घावनळे-वायंगणवाडी येथील दिक्षा तिमाजी बागवे (वय १७) हिच्या खून प्रकरणी संशयित कुणाल कृष्णा कुंभार (वय २२, रा. गोठोस-मांडशेतवाडी) याची पोलीस कोठडी आणखी दोन दिवसांनी वाढविण्यात आली आहे. कुडाळ न्यायालयाने सोमवारी हा निर्णय दिला.

दिक्षा बागवे हिचा मृतदेह वाडोस बांटमाचा चाळा परिसरातील शेतमांगरात सापडला होता. तपासादरम्यान पोलिसांनी दिक्षाशी शेवटचा संपर्क असलेल्या आणि चौकशीसाठी तीन वेळा पोलिस ठाण्यात हजर राहिलेल्या कुणाल कुंभारावर संशय घेतला होता. अखेर चौकशीत त्यानेच गुन्हा केल्याचे कबूल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.कुडाळ पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता, प्राथमिक तपासासाठी न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली होती. या कालावधीत पोलिसांनी घटनास्थळावरून आणि संशयिताकडून सुमारे १६ वस्तू जप्त केल्या आहेत. मात्र, दिक्षाची सुमारे ६ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन अद्याप सापडलेली नाही.

सोमवारी कुणालची प्राथमिक कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले. चौकशीतून हरवलेली चैन शोधणे तसेच या खुनात कुणाल सोबत अन्य कोणी सहभागी होते का? हे तपासण्यासाठी आणखी वेळ आवश्यक असल्याचे सांगत पोलिसांनी कोठडी वाढीची विनंती केली. न्यायालयाने ती मान्य करत कुणालला दोन दिवसांची अतिरिक्त पोलीस कोठडी सुनावली.अशी माहिती कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.

error: Content is protected !!