रेल्वे प्रवासात बेपत्ता झालेल्या इसमाचा मृतदेह सापडला

कणकवली तालुक्यातील नागवे ब्रिजखालच्या नाल्यामध्ये आढळला मृतदेह

कणकवली : रेल्वे प्रवासात बेपत्ता झालेले सुधाकर उर्फ सुधीर बुधाजी गवस (४६, रा. सासोली, ता. दोडामार्ग) हे सोमवारी सकाळच्या सुमारास रेल्वे मार्गावरील नागवे ब्रिजखाली नाल्यामध्ये मृत्तावस्थेत आढळून आले. सुधीर रेल्वेतून नेमके कसे खाली पडले, हे समजू शकलेले नाही.

सुधीर हे अंध असून ते अन्य काहींसमवेत मुंबईला जाण्यासाठी तुतारी एक्सप्रेसमधून प्रवास करत होते. शनिवारी रात्री ८.३० वा सुमारास गाडी कणकवली स्थानकातून मार्गस्थ झाली. मात्र, त्यानंतर सोबतच्यांना सुधीर हे बोगीमध्ये दिसून आले नाहीत. त्यांनी याबाबत रेल्वेच्या १३९ क्रमांकावर संपर्क साधून माहिती दिली. त्यानुसार रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक राजेश सुरवाडे, सहाय्यक उपनिरीक्षक दुर्गेश यादव, हवालदार मेलशिंगरे आदींनी कणकवली ते नांदगाव या दरम्यानच्या रेल्वे ट्रॅक परिसरात सुधीर यांचा शोध घेतला. मात्र सुधीर रविवारी दिवसभरात आढळून आले नव्हते.

सोमवारी सकाळपासून पुन्हा एकदा रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम राबवायला सुरुवात केली. अखेरीस नागवे येथील रेल्वे पुलाखालील नाल्यामध्ये एक मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती समजतच कणकवली पोलीस ठाण्याचे हवालदार चंद्रकांत झोरे व अन्य पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुधीर यांच्या नातेवाईकांनाही घटनास्थळी बोलावण्यात आले. त्यांनी पाहणी करून हा मृतदेह सुधीर यांचाच असल्याचे स्पष्ट केले. मृतदेह विच्छेदनासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे.

error: Content is protected !!