माजी आमदार परशुराम उपरकर यांचा सवाल
मुंबई गोवा महामार्गाची पुरती दुरावस्था झालेली आहे. त्यावर आवाज उठविला म्हणून माजी आमदार वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र वैभव नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करून महामार्गाची दुरावस्था थांबणार आहे का? आणि त्यातून महामार्गावर होणारी जीवितहानी टाळणार का? असा सवाल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी करत असे हजार गुन्हे दाखल केले तरी शिवसैनिक घाबरणार नाही. गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे ठाण मांडून बसलेले कनिष्ठ अभियंता साळुंखे यांची तातडीने बदली करण्याची मागणी श्री. उपरकर यांनी केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. उपरकर यांनी म्हटले आहे की, आजपर्यंत आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून अनेक आंदोलने, रास्तारोको केले, निवेदने दिली, चर्चा केली. मात्र महामार्गाच्या वस्तुस्थितीत कोणताही फरक पडलेला नाही. त्यामुळे शिवसेनेने केलेल्या आंदोलन व त्यातून झालेल्या उद्रेकाबाबत माजी आमदार वैभव नाईक यांच्यावरच नव्हेतर शिवसैनिकांवर हजार गुन्हे दाखल केले तरीही आम्ही घाबरणार नाही. उपअभियंता श्री. शेडेकर यांच्यानंतर आलेल्या श्री साळुंखे यांनी आपल्या कार्यकाळात महामार्गाच्या वस्तुस्थितीवर कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत,अथवा नियंत्रणही ठेवले नाही. महामार्गावर ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे आहेत. मिडल कट व या खड्ड्यांमुळे अनेकांचे जीव गेले. मात्र त्याबाबत कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. उलट ठेकेदार व महामार्गाच्या आरओ लाईन मध्ये येणाऱ्यांकडून मलिदा घेण्याचे काम साळुंखे यांनी केले आहे असा आरोपही श्री उपरकर यांनी केला आहे.
श्री साळुंखे हे गेली पाच सहा वर्ष याच ठिकाणी काम करीत आहेत. वास्तविक अशा अधिकाऱ्यांची तीन वर्षानंतर बदली होते मात्र हे येथे ठाण मांडून का आहेत? त्यांची तातडीने बदली करा अशी मागणी श्री. उपरकर यांनी केली आहे.



Subscribe









