१० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा
वैभववाडी तालुक्यातील घटना
वैभववाडी : वैभववाडी पोलीस ठाण्यात आलेल्या डायल ११२ च्या कॉलवर गेलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या संशयित राजरत्न अंकुश देवकर (वय ३२, रा. कोकिसरे-नारकरवाडी) याला सिंधुदुर्गचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधीर देशपांडे यांनी दोषी ठरवत १० वर्षे सश्रम कारावास व १८ हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता गजानन तोडकर यांनी काम पाहिले.
९ एप्रिल २०२२ ला राजरत्न देवकर याने आई-वडिलांसोबत वाद घालून त्यांच्यावर मारहाण केली. त्यावेळी हातात दोन चाकू घेऊन तो हिंसक बनला होता. आई-वडिलांनी त्याला मनोरुग्ण रुग्णालयात नेण्यासाठी अॅम्ब्युलन्स बोलावली होती, मात्र तो त्यात बसायला तयार नव्हता. त्यामुळे घरमालकाने वैभववाडी पोलिसांना ११२ वर कॉल करून मदतीसाठी पाचारण केले.
पोलीस हवालदार शैलेश कांबळे, पोलीस नाईक रमेश नारनवर, कॉन्स्टेबल कृष्णात पडवळ व हरिश्चंद्र जायभाय हे घटनास्थळी गेले. पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपी संतापला. त्याने पोलीस नाईक रमेश नारनवर यांच्यावर चाकूने दोन वार करून जखमी केले. इतर पोलीस व ग्रामस्थांनी झडप घालून त्याला पकडले. जखमी नारनवर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
या गुन्ह्यात आठ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. संशयिताने स्वतःला वेडसर असल्याचा बचाव केला होता; मात्र सरकारी पक्षाने तो खोडून काढला. अखेर न्यायालयाने संशयिताला दोषी ठरवत १० वर्षांची सश्रम शिक्षा व दंड ठोठावला. त्याची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली.














 
	

 Subscribe
Subscribe









