बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळच्या विद्यार्थ्यांनी अनुभवली लोकशाहीतील निवडणूक प्रक्रिया

कुडाळ : कुडाळ येथील बॅ नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळ या प्रशालेमध्ये दि. १ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त. ‘मतदान करणे हा माझा हक्क आहे. हे विद्यार्थ्यांना कळावे म्हणून विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाची निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली

सुरुवातीला विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाची निवडणूक प्रक्रिया सर्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आली. प्रतिनिधी मंडळासाठीचा अर्ज कसा भरावा, अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया, आपण वर्षभरामध्ये शाळेसाठी कोणकोणत्या गोष्टी करणार आहोत त्याबद्दलचा कार्य अहवाल मतदारांपर्यंत पोहोचवणे, संपूर्ण मतदान प्रक्रियेदरम्यान पाळावयाची आदर्श आचारसंहिता इ. बद्दलची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून रोहिदास राणे यांनी समजावून सांगितली.

दुपारी ठिक १२.३० वाजता सर्व विद्यार्थ्यांना मुख्य सभागृहात पाचारण करण्यात आले. त्यानंतर शिक्षिका सौ.अश्विनी परब यांनी आदर्श लोकशाहीची संकल्पना स्पष्ट केली. दरम्यान निवडणूक अधिकारी क्र. १,२ व ३ म्हणून अनुक्रमे शिक्षिका सौ. अश्विनी परब, सौ. अदिती घाडी, व शिक्षक श्री. मयुरेश लाड यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली.

सर्व मतदार अर्थातविद्यार्थी आपापल्या वर्गाप्रमाणे रांगेत प्रतिक्षेत उभे होते. निवडणूक अधिकारी क्र. १ यांच्याकडून प्रत्येक मतदार विद्यार्थ्यांची खातरजमा करण्यात येत होती. पुढे निवडणूक अधिकारी क्र. २ यांच्याकडून प्रत्येकाच्या बोटावर शाई लावली जात होती तदनंतर प्रत्येकाला एकंदर ३ मतपत्रिका निवडणूक अधिकारी क्र. ३ यांच्याकडून दिल्या जात होत्या.
यामध्ये विद्यार्थी प्रतिनिधी मंडळाचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, क्रीडामंत्री इ. साठी मतदान प्रक्रिया राबविण्यात आली.

या सर्व प्रक्रियेत प्राथमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका सौ. चित्रा कुंटे, माध्यमिक विभागाच्या उपमुख्याध्यापिका सौ. प्रिती म्हाडदळकर इ.नी मदतीचा हात दिला.या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेची तयारी ज्येष्ठ शिक्षक श्री. रोहिदास राणे, विश्वजीत डांगमोडेकर, मयुरेश लाड, पूर्णिमा साटम, प्राजक्ता मेस्त्री इ. नी विशेष मेहनत घेतली.

प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. चैताली बांदेकर यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना ‘ आज आपल्या विद्यार्थ्यांनी ख-या अर्थाने लोकशाहीची निवडणूक प्रक्रिया अनुभवल्या’चे गौरवोद्गार काढले.
तर ‘आजची युवा पिढी हीच उद्याच्या परिपूर्ण भारताचे भक्कम आधारस्तंभ असल्याने लोकशाही व्यवस्थेतील निवडणूक प्रक्रिया जाणून घेणे ही काळाची गरज असल्या’ चे प्रतिपादन बॅ.नाथ पै सेंट्रल स्कूल कुडाळचे अध्यक्ष मा. उमेशजी गाळवणकर यांनी केले.

error: Content is protected !!