कणकवली कॉलेजच्या विद्यार्थिनी कु. स्नेहल संतोष तवटे हिचे चार्टर्ड अकाउंटंट (CA) Final Examination – 2026 मध्ये दैदिप्यमान यश

कणकवली : शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कणकवली कॉलेज, कणकवली येथील वाणिज्य विभागाची विद्यार्थिनी कु. स्नेहल संतोष तवटे हिने The Institute of Chartered Accountants of India (ICAI) मार्फत घेण्यात आलेल्या Chartered Accountant (CA) Final Examination – 2026 मध्ये दैदिप्यमान यश संपादन करून महाविद्यालयाच्या यशपरंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
देशातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या, कठीण आणि स्पर्धात्मक व्यावसायिक परीक्षांपैकी एक मानल्या जाणाऱ्या चार्टर्ड अकाउंटंट (CA) परीक्षेत कु. स्नेहल हिने कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास, आत्मविश्वास आणि चिकाटीच्या बळावर उल्लेखनीय यश मिळविले आहे. तिच्या या यशामुळे कणकवली कॉलेज, वाणिज्य विभाग तसेच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्राचा गौरव उंचावला आहे.

कणकवली कॉलेजचा वाणिज्य विभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असून स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक अभ्यासक्रम, कौशल्य विकास, उद्योगाभिमुख शिक्षण आणि करिअर मार्गदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सक्षम व्यावसायिक म्हणून घडविण्याचे कार्य करीत आहे. या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे हे यशस्वी फलित असल्याचे महाविद्यालयाने नमूद केले.
कु. स्नेहल हिच्या या उज्ज्वल यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन प्रा. डॉ. राजश्री साळुंखे, विश्वस्त श्री. अनिल देगवेकर, श्री. सतीश नाईक, डॉ. सविता तायशेटे, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. युवराज महालिंगे, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी तसेच विद्यार्थ्यांनी तिचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

यावेळी वाणिज्य विभागप्रमुख डॉ. रामदास एन. बोलके म्हणाले, “कु. स्नेहल हिचे हे यश वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. तिच्या यशामुळे अधिकाधिक विद्यार्थी चार्टर्ड अकाउंटन्सी (CA), कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटन्सी (CMA), कंपनी सेक्रेटरी (CS) तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे निश्चितच आकर्षित होतील. तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!”

कु. स्नेहल तवटे हिच्या या उल्लेखनीय यशामुळे कणकवली कॉलेजच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची आणि विद्यार्थीकेंद्रित शैक्षणिक परंपरेची आणखी एकदा प्रचिती आली असून संपूर्ण महाविद्यालयासाठी हा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण ठरला आहे.

error: Content is protected !!