संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा वर्धापन दिन गुरुवारी २५ जून रोजी

कुडाळ : क. म. शि. प्र. मंडळाच्या संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळचा ४२ वा वर्धापन दिन गुरुवार दि. २५ जून २०२६ रोजी साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने सकाळी ठीक दहा वाजता कॉलेजच्या श्री एकनाथ ठाकूर सभागृहात वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती कॉलेजचे डॉ. प्रा. एस. टी. आवटे यांनी दिली. महाविद्यलयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ. आवटे यांनी कॉलजेची आतापर्यंतची वाटचाल सांगितली आणि सर्व माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले.


डॉ. प्रा. आवटे म्हणाले, क.म.शि.प्र. मंडळ संचलित, संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा ४२ वा वर्धापन दिन सोहळा गुरुवार दिनांक २५ जून २०२६ रोजी सकाळी १० वा आयोजित करण्यात आला आहे. क.म.शि.प्र. मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून बार कौन्सिल महाराष्ट्र व गोवाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सदस्य ऍड. संग्राम देसाई उपस्थित राहणार आहेत. महाविद्यलयाच्या श्री एकनाथ ठाकूर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदीप परब यांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच विशेष कामगिरी करणाऱ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन संत राऊळ महाराज महाविद्यालच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे आणि क.म.शि.प्र. मंडळाचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट आणि सरकार्यवाह अनंत वैद्य यांच्या वतीने डॉ. प्रा. आवटे यांनी केले आहे.


डॉ. प्रा. आवटे यांनी कॉलेजच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा देखील आढावा घेतला. २५ जून १९८४ रोजी महाविद्यालय सुरु झाले आणि तेव्हापासून कॉलेजने आपल्या प्रगतीमध्ये मोठी उंची गाठली आहे. आर्ट्स आणि कॉमर्स या दोन शाखा पासून कॉलेज सुरू झाले. आज बीएससी, बीएएमएस, आयटी, सीएस त्याबरोबरच पदव्युत्तर शिक्षणाची सोय या महाविद्यालयात आहे. सिंधुदुर्ग सारख्या एका ग्रामीण भागामध्ये, छोट्याशा जिल्ह्यामध्ये सर्व स्तराचे सगळे शिक्षण या ठिकाणी येथील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयात उपलब्ध करून दिलेले आहे.


त्याचबरोबर महाविद्यालयांमध्ये व्यवसायिक अभ्यासक्रमासोबतच ग्रामीण विद्यार्थ्यांना आर्थिक मदत व्हावी या उद्देशाने याच वर्षी ऑलटीम कंपनी सोबत करार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना शिकता शिकता देखील काहीतरी अर्थार्जन करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्याचबरोबर निकालात सुद्धा महाविद्यालय जिल्ह्यात नेहमीच अग्रेसर राहिलेले आहे. गेल्या वर्षी स्पोर्ट्स मध्ये तर महाविद्यालयाने अनेक सुवर्णपदके मिळविली. सांस्कृतिक क्षेत्रात सुद्धा महाविद्यालय अग्रेसर आहे. वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये, सांस्कृतिक स्पर्धा मध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी भाग घेऊन विद्यापीठ स्तरावर यश मिळविले आहे. सलग दोन वर्षे एसवायबीएची विद्यार्थीनी श्रुतिका मोर्ये हिने पखवाज वादन मध्ये राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक प्राप्त केले आहे आणि विद्यापीठाचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय स्तरावर केलेले आहे.


कॉलेजच्या सुरुवातीपासून वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कॉलेजचे विद्यार्थी चमकत आहेत. विद्यार्थी आज समाज जीवनामध्ये पण सामाजिक क्षेत्रामध्ये सामाजिक जाणीवांमध्ये ते कार्य करत आहेत. अशाप्रकारे महाविद्यालय जिल्ह्यामध्ये एक अग्रणी महाविद्यालय म्हणून कार्यरत आहे असे डॉ. प्रा. आवटे यांनी सांगून कॉलेजच्या वर्धापन दिन सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
या पत्रकार परिषदेला डॉ. प्रा. एस.के. पवार, डॉ. शरयू आसोलकर, डॉ.प्रकाश मसुरकर, डॉ. कमलाकर चव्हाण, प्रा. दीपक चव्हाण, प्रा. चांदेकर, प्रा. रिता ठाकूर, प्रा. सदाशिव प्रभू आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!