प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरणी न्यायालयाचे आदेश
सिंधुदुर्ग :सावंतवाडी माठेवाडा येथील विवाहिता सौ. प्रिया पराग चव्हाण यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या देवगडच्या माजी नगराध्यक्षा प्रणाली माने, मुलगा आर्य माने व पती मिलींद माने यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती व्ही. एस. देशमुख यांनी प्रत्येकी २५ हजार रुपयांचा सशर्थ अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. संशयितांपैकी प्रणाली व आर्य माने यांच्यावतीने अँड.उमेश सावंत तर मिलींद माने यांच्यावतीने अँड.संग्राम देसाई यांनी काम पाहिले.
३ जुलैच्या रात्री प्रणाली माने यांच्या आईच्या घरी झालेल्या कुटुंबाच्या बैठकीत सौ. प्रिया हिला आपल्या पतीबरोबर असलेल्या आर्थिक व्यवहारांबाबत विचारणा केली. त्यामुळे त्या मध्यरात्री प्रिया यांनी त्यांच्या राहत्या घराच्या बेडरुममध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. याबाबत ६ जुलै रोजी त्यांचे वडील विलास तावडे (रा. कलंबिस्त) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम १०८ प्रमाणे प्रणाली व आर्य माने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आत्महत्येपूर्वी सौ. प्रिया हिचे मोबाईलवरून मिलींद माने याच्यासोबत १८ मिनीटे बोलणे झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने नंतर मिलींद माने यालाही आरोपी करण्यात आले होते. याबाबत प्रणाली व आर्य यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात ८ जुलै रोजी अर्ज दाखल केला होता व त्यांना अंतरीम अटकपुर्व जामिन मंजूर झाला होता.
दरम्यान, मिलींद माने यांच्यावतीनेही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला होता. सुनावणीअंती त्यालाही अंतरीम अटकपूर्व जामिन मंजूर झाला होता. अंतीम सुनावणीअंती न्यायालयाने सोमवारी यापुर्वी दिलेले अंतरीम आदेश कायम करतानाच तिघांनाही अटकपूर्व जामिन मंजूर केला. तसेच तपासात सहकार्य करावे, पुराव्यात ढवळाढवळ करू नये आदी अटी घालण्यात आल्या आहेत.