मुलीची इंस्टाग्रामवर झाली होती तरुणाशी ओळख
कणकवली : दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेणाऱ्या तरूणाला कणकवली पोलिसांनी आज ताब्यात घेतले. हातखंबा (ता. रत्नागिरी) येथे ही कारवाई करण्यात आली. यात त्या अल्पवयीन मुलीलाही ताब्यात घेण्यात आले आहे. मुलीच्या वडिलांनी याबाबतची तक्रार कणकवली पोलीस ठाण्यात नोंदवली होती.
दहावीत शिकणाऱ्या मुलीची इन्स्टाग्राम या सोशलमिडिया वेबसाईटवरून दीपक ज्योतिराम माने (वय २४, रा. हातखंबा, पांडवळ फाटा) याच्याशी ओळख झाली होती. ओळखीचा फायदा घेऊन दीपक माने याने तिला ४ जुलैला पळवून नेले होते.
दरम्यान ४ जुलै रोजी अल्पवयीन मुलगी शाळेत जाते असे सांगून घरातून बाहेर पडली होती. शाळा सुटली तरी ती घरी न आल्याने तिच्या वडलांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. दरम्यान त्या अल्पवयीन मुलीने आपल्या वडिलांचा मोबाईल आपल्या सोबत नेला होता. त्या मोबाईलच्या लोकेशनवरून कणकवली पोलिसांनी आज हातखंबा येथून अल्पवयीन मुलगी आणि तिच्या सोबत असलेल्या दीपक माने याला ताब्यात घेतले. कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उल्हास जाधव आणि महिला पोलीस प्रणाली जाधव यांनी ही कामगिरी बजावली.
हातखंबा गावात पांडवळ फाटा येथे संशयित आरोपी दीपक माने याच्या घरात दीपक आणि अपहरण झालेली मुलगी आढळून आली. त्या मुलीसह संशयित आरोपीला ताब्यात घेऊन पोलीस उपनिरीक्षक श्री. जाधव यांनी सायंकाळी उशिरा कणकवली पोलीस ठाण्यात आणले होते.