सिंधुदुर्ग : कर्मचारी, शिक्षकांच्या न्यायसंगत मागण्यांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळा, विद्यार्थी, शिक्षकांच्या समस्यांची सोडवणूक करण्याकडे होत असलेले दुर्लक्ष, संचमान्यतेच्या चुकीच्या धोरणामुळे गोरगरीब, शेतकरी-शेतमजूर, कष्टकरी-कामकरांच्या पाल्यांच्या शिक्षणाची होणारी दुरवस्था, कमी पटसंख्येसाठी शिक्षक जबाबदार अशाप्रकारची केली जाणारी बदनामी, शाळांमध्ये आवश्यक भौतिक सुविधांची वानवा, बी.एल.ओ.सह दैनंदिन अध्यापन कार्यावर विपरीत परिणाम करणाऱ्या अशैक्षणिक व अन्य कामांचे ओझे अशा अनेक समस्या शिक्षण क्षेत्रात असल्याने महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक समन्वय समितीने पुकारलेल्या आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदविला.
शैक्षणिक समस्यांवर सकारात्मक निर्णय शासन स्तरावरून होत नसल्याने आम्हाला आंदोलनाशिवाय तरणोपाय नाही,या समस्यांवर उचित निर्णय न झाल्यास लढा आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस यांनी दिला.
शिक्षक समिती सिंधुदुर्ग च्या सर्व सदस्यांनी आज शाळांवर काळ्या फिती लावून कामकाज केले तर जिल्हाधिकारी कार्यालय समोरील निदर्शने आंदोलनात जिल्हाध्यक्ष विठ्ठल गवस,जिल्हा सरचिटणीस तुषार आरोसकर, राज्य पदाधिकारी नामदेव जांभवडेकर,राजू वजराटकर,प्रशांत मडगांवकर, जिल्हा सल्लागार नंदकुमार राणे,त्रिंबक आजगांवकर, सर्व तालुकाध्यक्ष,जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते.