बकरी लटकली विद्युत वाहिनीला

चालत्या कंटेनरमधून मारली उडी

सावंतवाडी : चालत्या कंटेनर मधून रस्त्यावर उडी मारणारी बकरी थेट प्रवाहीत असलेल्या वीज वाहिनीमध्ये अडकल्याचा प्रकार येथे घडला. त्यानंतर वीज पुरवठा खंडीत करून त्या बकरीला तारेतून सुखरूप सोडविण्यात आले. ही घटना आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास उपरलकर देवस्थान परिसरात सावंतवाडी-आंबोली रस्त्यावर घडली.

दरम्यान थोडासा वेगळा प्रकार पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, गुजरात येथील काही बकरी व्यावसायिक चार ते पाच मोठ्या कंटेनरने बकऱ्या घेऊन कोल्हापूरच्या दिशेने जात होते. त्यातील एका कंटेनरमध्ये असलेल्या बकरीने गाडीतून थेट बाहेर उडी मारली आणि ती रस्त्याच्या बाजूला असलेल्या वीज वाहिन्यावर जाऊन लोंबकळलेल्या अवस्थेत अडकली. हा प्रकार तात्काळ चालकाच्या लक्षात आला. त्याने तात्काळ गाडी थांबवली मात्र वीज वाहिनी सुरू असल्यामुळे बकरीला सोडवता येणे शक्य झाले नाही.

दरम्यान हा प्रकार तेथून जाणाऱ्या प्रवाशांनी पाहिला व मदतकार्य सुरू झाले. यावेळी बकरी थेट वीज वाहिन्यावर लोंबकळलेल्या अवस्थेत दिसत असल्यामुळे त्यातील काही लोकांनी वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना फोन केला. त्यानंतर वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्यानंतर वीज कंपनीचे कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झाले. त्यानंतर सर्वांनी मिळून त्या बकरीला लाकडाच्या सहाय्याने वीज वाहिनीतून सुखरूप सोडवले. त्यानंतर संबंधित चालक त्या बकरीला घेऊन तिथून निघून गेला. हा प्रकार पाहण्यासाठी नागरिकांनी त्याठिकाणी मोठी गर्दी केली होती.

error: Content is protected !!