नर्सिंगच्या ६ विद्यार्थिनींसह ७ जण जखमी
चालक हेमंत भोगले रिक्षा घेऊन फरार
अणाव – हुमरमळा ते कुडाळच्या दिशेने येणारी तीन चाकी रिक्षा कुडाळ शहरातील क्षितिज कॉम्प्लेक्स समोरील वळणावर पलटी झाली या रिक्षे मधील पुष्पसेन सावंत नर्सिंग स्कूल मधील नर्सिंगचे सहा विद्यार्थी व चालकाचा मित्र असे सात जण जखमी झाले त्यामध्ये नर्सिंगच्या साक्षी म्हापणकर व भूमिका म्हापणकर या विद्यार्थ्यांसह रिक्षा चालकाचा मित्र वैभव निकम याला ओरोस जिल्हा रुग्णालय येथे अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले. हा रिक्षा व्यावसायिक कणकवलीतला असून अपघात झाल्यावर त्याने पळ काढला.
कणकवली येथील वैभव निकम याच्या मावस भावाची परीक्षा अणाव हुमरमळा येथील पुष्पसेन सावंत विद्यालयात होती. ही परीक्षा देण्यासाठी त्याने कणकवली येथील त्याचा मित्र रिक्षा चालक हेमंत भोगले याला घेऊन आला होता. दरम्यान परीक्षेला सोडल्यानंतर हुमरमळा येथील राणे स्टॉप वर असलेल्या कुडाळच्या दिशेने येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी कुडाळ येथे सोडण्यासाठी रिक्षेने रिक्षा चालक हेमंत भोगले त्याचा मित्र वैभव निकम येत होते. या रिक्षेमध्ये पुष्पसेन सावंत नर्सिंग स्कूलच्या पाच मुली व एक मुलगा असे सहा जण होते. महामार्गावरून ही रिक्षा कुडाळ एस. टी. बस स्थानकाच्या दिशेने येत असताना क्षितिज कॉम्प्लेक्स समोरील वळणावर पलटी झाली. या रिक्षेचा वेग ही जास्त होता. विद्यार्थ्यांनी सांगितले की, हा रिक्षा चालक वेगाने रिक्षा चालवत होता. दोन वाहनांना तो ठोकर देणार होता. दरम्यान क्षितिज कॉम्प्लेक्स जवळ ही रिक्षा पलटी झाली.
या रिक्षामध्ये असलेले सर्वजण बाहेर फेकले गेले त्यात काळसे येथील विद्यार्थिनी साक्षी म्हापणकर व भूमिका म्हापणकर या जखमी झाल्या इतर विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. तसेच रिक्षाचालकाचा मित्र वैभव निकम यांच्या पायाला गंभीर जखम झाली. त्यांना तात्काळ कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. हा अपघात झाल्यानंतर कणकवली येथील रिक्षा चालक हेमंत भोगले हा आपली रिक्षा घेऊन कणकवलीच्या दिशेने पळाला.
या अपघातातील सर्व विद्यार्थ्यांवर व वैभव निकम याच्यावर कुडाळ ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. दरम्यान यातील वैभव निकम, विद्यार्थिनी साक्षी म्हापणकर व भूमिका म्हापणकर यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले.