तब्बल ४५ तोळे वजनाचे दागिने लंपास

पिंगुळीत चोरट्याने बंद घर फोडले

कुडाळ : तालुक्यातील पिंगुळी – राऊळवाडी येथील बंद घर चोरट्याने फोडून तब्बल 45 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व 1 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम मिळून 24 लाख 15 हजार रु.किंमतीचा ऐवज लंपास केला. ही घटना गुरुवारी सकाळी 9.45 ते सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली.भरदिवसा मुख्य रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या घरात चोरट्याने चोरीचे धाडस केले. याबाबतची फिर्याद दिपा संतोष परुळेकर( रा. पिंगुळी राऊळवाडी )यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात दिली. दिपा परुळेकर व त्यांचे पती शासकीय नोकरीला आहेत.आज सकाळी नेहमीप्रमाणे ते दोघेही ओरोस येथे कामावर गेले.आज सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दोघेही घरी आले असता त्याच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा उचकटलेला दिसला.आत जाऊन पाहिले असता, लोखंडी कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त टाकलेले दिसले.तसेच बिछान्यातील साहित्य अस्ताव्यस्त टाकलेले आणि त्यामध्ये एका डब्यात ठेवलेले 45 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने तसेच 1 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम तेथे नसल्याचे दिसले. चोरट्याने तो ऐवज चोरून नेल्याची खात्री होताच रात्री पोलिसात फिर्याद देण्यात आली.घटनेची माहिती मिळताच कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम व स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्री.कोल्हे पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.ओरोस येथील श्वान पथक बोलाविण्यात आले.

error: Content is protected !!